मलेशियात ५० दिवसांनंतर मॉल सुरू ; वस्तूंवर बुरशीचं साम्राज्य

मॉलमधील व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.   

Updated: May 17, 2020, 11:59 AM IST
मलेशियात ५० दिवसांनंतर मॉल सुरू ; वस्तूंवर बुरशीचं साम्राज्य

मलेशिया : गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. अद्यापही जगावर आलेले हे वादळ शांत झालेलं नाही. यापासून वाचण्यासाठी अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन घोषित केला. लॉकडाऊनच्या कडक नियमांमुळे काही राष्टांमध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. असचं काहीस चित्र मलेशियात पाहायला मिळत आहे. तब्बल ५० दिवसांच्या लॉकडाऊन नंतर येथील मॉल आणि दुकानं सुरू करण्यात आले आहेत. 

पन्नास दिवसांनंतर मॉल सुरू झाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. पण मॉलमधील व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पेनांग पुलाऊ टिकूसमधील मॉल ५० दिवसांनंतर सुरु करण्यात आला. मॉलमधील लेदरच्या वस्तुंना चक्क बुरशी लागली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. तब्बल दोन महिने दुकानातील एसी आणि साफसाफाई बंद असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे दिसून येत आहे. 

इंडोनेशियामधील सरकारने अनेक अटी आणि निर्बंधांचे पालन करण्याचे आदेश मॉल्स आणि दुकानदारांना दिले आहेत. मलेशियामध्ये सध्या ६ हजार ८७२ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. यात  ११३ जणांचा मृत्यू झाला असून ५ हजार ५१२ रुग्ण सुखरूप बरे झाले आहेत. १ हजार २४७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती worldometers.info कडून प्राप्त करण्यात आली आहे.