Raj Thackeray Says Pune Rally Speech: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी महायुतीचे पुणे मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. राज ठाकरेंनी यावेळेस दिलेल्या भाषणामध्ये पुणे शहराचं संपूर्ण नियोजन विस्कटलेलं असल्याचा मुद्दा उपस्थित करत शहराच्या विकासाठी पुणेकरांनी मतदान केलं पाहिजे असं म्हटलं. राज ठाकरेंनी अगदी शहरनियोजनासंदर्भातील सविस्तर आकडेवारी मांडत विकासाच्या मुद्द्यावरुन आपली भूमिका स्पष्ट केली.
"राजकारणाचा, भाषेचा स्तर खालावला गेला आहे. आपला महाराष्ट्र असा कधीच नव्हता. इतर राज्यांची आणि आपली संस्कृती वेगळी आहे," असंही राज म्हणाले. "मी पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी जाहीर सभा घेतो ह्याचा एक महत्त्वाचं कारण म्हणजे वेडंवाकडं वाढत जाणाऱ्या पुणे शहराला आकार यावा. पुणे शहराला नियोजनाची गरज आहे आणि त्यासाठी नगरसेवकापासून, आमदार आणि थेट खासदारापर्यंत एकदिलाने, संयुक्त काम होणं गरजेचं आहे," असं राज म्हणाले.
"2014 साली मी सौंदर्यदृष्टीवर एक माहितीपट बनवला होता त्यात मी देशाबाहेर जाणाऱ्या गुणवान तरुणाईचा मुद्दा मांडला होता, त्यांना आपल्या देशातच रहावं असं वातावरण उभं केलं पाहिजे त्यासाठी आपली शहरं त्या उच्च दर्जाची व्हावीत आणि हेच केंद्र सरकारकडून सत्तेतला खासदार करवून घेऊ शकतो हे ही सभा घेण्यामागचं दुसरं कारण," असं राज म्हणाले.
"अहो, मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला पब पुणे शहर बिघडायला वेळही लागणार नाही हे मी गेले अनेक वर्ष पुण्यात येऊन सांगतोय. मुंबई-पुणे महामार्ग झाला आणि या आक्राळ-विक्राळ रूप धारण केलं. कारण व्यापक शहर नियोजन नाही, तात्पुरत्या सोयीसाठी विकासकामं झाली आणि शहराचं नियोजन बिघडलं. 70 लाख लोकसंख्या असणाऱ्या पुणे शहरात वाहनं किती 72 लाख. कसे रस्ते पुरतील या शहराला?" असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
नक्की वाचा >> 'मोदींच्या काळात ‘हिंदू खतरे में’ असेल तर..', ठाकरेंचा टोला! म्हणाले, 'आगलाव्या पक्षांनी..'
"पुण्यात मेट्रो आली तेव्हाही मी शासकीय अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, "प्रयोग म्हणून एक मेट्रो सुरु करून बघा. पुणेकर ती वापरतात का?" याचं कारण प्रत्येक शहराची एक मानसिकता असते. मुंबईत लोकलची सवय आहे पण पुणेकरांना दुचाकी सोयीस्कर वाटते. एका शहराला 15 % रस्ते लागतात पण आज पुणे शहराला 8 % रस्ते आहेत फक्त मग वाहतूक व्यवस्था कोलमडणार नाहीतर काय?" असंही राज ठाकरे म्हणाले. "पुण्यात असंख्य विद्यापीठं, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला महाविद्यालयं, अभिमत विद्यापीठं, आयटीपार्क, कॉर्पोरेट क्षेत्र प्रचंड आहे. आपलं पुणे दिल्लीला म्हणजे केंद्र सरकारला 80 हजार कोटी रुपये कर स्वरूपात देतं. इतकी अफाट शक्ती आहे पुण्याची मग अशा शहराच्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी जास्त असते. इथे महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार असा ताळमेळ अतिशय महत्त्वाचा आहे," असं राज ठाकरे म्हणाले.