मुंबई : उन्हाच्या झळा अंगाची लाही- लाही करत असतानाच रविवारी सायंकाळी कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर भागात पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह या भागांमध्ये पाऊस पडल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शनिवारी पुणे, नगर, नाशिक परिसरातही पावसाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. तर, काही भागांमध्ये पावसाने जोरदार उपस्थिती लावली होती.
तापमानाचा पारा चढत असतानाच पावसाच्या हजेरीमुळे अनेकजण सुखावले आहेत. संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. कल्याण शहराच्या अनेक भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. दोन दिवसांपासून या भागात प्रचंड उकाडा होत होता पण, संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात अल्हाददायक गारवा निर्माण झाला. अंबरनाथमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. पावसामुळे अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची या अवकाळी पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
नाशिक शहरासह ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसाने जिल्ह्यात तिघांचा वीज कोसळून मृत्यू झाला. तर, एक जण होरपळल्याची माहिती समोर येत आहे. मानूर गावात ही घटना घडली. संध्याकाळच्या सुमारास मानूर गावाजवळ काही तरूण क्रिकेट खेळत होते. अचानक वादळ वाऱ्यासह पाऊस आला. त्याचच क्रिकेट खेळणाऱ्या तरूणांवर वीज कोसळली. त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रोहित गायकवाड, सागर गवे आणि अनिल गवे अशी मृतांची नावं आहेत. दुसरीकडं नाशिक शहरातही पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नाशिककरांची तारांबळ उडाली. पावसाच्या शिडकाव्यामुळं नागरिकांना उकाड्यापासून थोड़़ासा दिलासा मिळाला. या अवकाळी पावसामुळे कांदा, डाळिंब, द्राक्ष आणि आंबा पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.