मुंबई : 4G इंटरनेट आणि फ्री मोबाईलनंतर रिलायन्स जिओ विद्यार्थ्यांना आणखी एक खुशखबर देण्याच्या तयारीमध्ये आहे. देशभरातल्या कॉलेजमध्ये फ्री वाय-फाय सुविधा देण्याचा विचार जिओ करत आहे. यामागणीचं पत्र जिओनं मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्त हिंदूस्तान टाईम्सनं प्रसिद्ध केलं आहे. मागच्या महिन्यामध्ये जिओनं मनुष्यबळ विकास मंत्रालयापुढे प्रेझेंटेशनही दिल्याची माहिती आहे.
जिओच्या या प्रस्तावाचा मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून विचार सुरु असल्याचंही सांगितलं जात असलं तरी याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. कॉलेजमध्ये फ्री वाय-फाय सुविधा उपलब्ध करून द्यायची असेल तर त्यासाठी पारदर्शक टेंडरिंग प्रक्रियेतून जिओला जावं लागेल, असंही मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या देशातल्या जवळपास ३८ हजार कॉलेजमध्ये फ्री वाय-फाय सुविधा देण्याचा प्रस्ताव जिओनं मंत्रालयापुढे ठेवला आहे. जिओचा हा प्रस्ताव अस्तित्वात आला तर तीन कोटी विद्यार्थ्यांना फ्री वाय-फाय वापरता येईल. या फ्री वाय-फायमुळे विद्यार्थ्यांना नॅशनल नॉलेज प्लॅटफॉर्मच्या 'स्वयम'मधून अभ्यास करणं सोपं जाईल. यासाठी जिओ हॉटस्पॉट तयार करण्याची तयारीही जिओनं दाखवली आहे.
अशाप्रकारचा प्रस्ताव देणारी जिओही पहिलीच टेलिकॉम कंपनी आहे. त्यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांनाही समान संधी मिळावी असं मनुष्यबळ विकास मंत्रालयाला वाटत आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रस्तावित असलेल्या केंद्रीय विद्यापीठातल्या फ्री वाय-फाय सुविधेला ३१ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. देशातल्या ३८ केंद्रीय विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.