Leh Ladakh News : लडाख... थरारक वाटांवर निघणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी (Adventure Bike Ride) आणि अॅडवेंचर डाईव्हिंगच्या थराराची आवड असणाऱ्यांसाठी आवडीचं ठिकाण. डोंगरकपाऱ्यांमधून, निळ्याशार नद्यांच्या प्रवासांहांच्या साथीनं जाणारे रस्ते, डोळ्यांवर विश्वासही बसणार नाही, अशी तलावक्षेत्र आणि नजर जाईल तिथवर पसरलेल्या पर्वतरांगा, रक्त गोठवणारी थंडी या अशा वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण या भागाला भेट देतात. (Leh Market) लेहपासून सुरु झालेला हा प्रवास पुढं लडाख आणि काही दुर्गम डोंगररांगांच्या दिशेनं सुरुच राहतो.
थोडक्यात, लडाखला येऊन आठवणी सोबत नेण्याकडेच या सर्व मंडळींचा कल दिसतो. पण, याच लडाखच्या सौंदर्याला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न जरी केला तर मात्र त्यांची खैर नाही.
असं का? नुकत्याच घडलेल्या एका घडटनेवरून तुम्हाला या प्रश्नाचंही उत्तर मिळणार आहे. भाजपचे लडाखमधील खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल (Jamyang Tsering Namgyal) यांनीच या मुद्द्याकडे लक्ष वेधत भारतातील बड्या कार निर्मात्या Maruti Suzuki या कंपनीला खडे बोल सुनावले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये मारुती सुझुकी जिम्नी (Jimny) एसयुव्ही जलपात्रातून येत असून, तिथंच असणारं कॅमेरा युनिट हे सर्व चित्रीत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ही एसयुव्ही Gypsy SUV चं fourth-gen model असून, ऑफरोडिंगसाठी यामध्ये काही अफलातून फिचर्स देण्यात आल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.
नामग्याल यांनी ट्विट करत याच प्रकरणावरून Maruti Suzuki वर नाराजीचा सूर आळवला. या कंपनीकडून Jimny SUV च्या नव्या मॉडेलच्या लाँचआधी एका जाहिरातीचं चित्रीकरण या भागात करण्यात येत होतं. पण, तलावापाशी जाहिरातीचं चित्रीकरण करत असताना कंपनीशी संलग्न मंडळींकडून बेजबाबदार वर्तन आणि कृती पाहायला मिळाल्या आणि या मंडळींकडून व्यावसायिक उद्देशानं या संवेदनशील भागातील पर्यावरणसंस्थेला नुकसान पोहोचत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणत Maruti Suzuki ला खडे बोल सुनावले.
ट्विटरच्या माध्यमातून नामग्याल यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना तातडीनं तलावापाशी सुरु असणारं चित्रीकरण थांबवण्याची विनंती करत दोषींवर कायदेशी कारवाई करण्याची मागणीही केली. यावेळी त्यांनी पुढील पिढीसाठी लडाखच्या सौंदर्याचं जतन करूया, असा संदेशही सर्वांना दिला. नामग्याल यांचं ट्विट व्हायरल झाल्यानंतर लगेचच पोलिसांनी हे प्रकरण हाती घेत सदर कंपनीला जाहिरातीचं चित्रीकरण थांबवण्यास सांगितलं.
I condemn @Maruti_Corp's irresponsible advertisement act. The fragile ecosystem should not be destroyed for the sake of commercial gain. I urge the administration to halt the shooting & take legal action as necessary. Let's preserve the unique beauty of Ladakh for future gen. pic.twitter.com/2IaC4vUkcI
— Jamyang Tsering Namgyal (@jtnladakh) April 10, 2023
तुम्हीही लडाखला जाताय?
लडाखला जाण्याचा बेत तुम्हीही आखताय? तिथं गेलं असता एक जबबादार पर्यटक म्हणून काही गोष्टी लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. उत्साहाच्या भरात काही पर्यटकांनी पँगाँग लेकमध्येही वाहनं उतरवल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. पण, असं करत असताना आपणच त्या स्थळांच्या सौंदर्याला गालबोट लावत आहोत ही बाब लक्षात घ्या. कोणताही चुकीचा प्रकार घडत असल्याचं दिसल्यास संबंधित प्रशासन आणि यंत्रणांना याची माहिती द्या. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जा!