मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपमध्ये पूर्ण क्षमतेने खेळल्याच भारतीय टीमचा विजय होईल, असा विश्वास भारतीय टेस्ट टीमचा खेळाडू चेतेश्वर पुजाराने व्यक्त केला आहे. 'एक भारतीय म्हणून इतर भारतीयांप्रमाणेच आमचा विजय व्हावा, अशी माझी अपेक्षा आहे,' असं वक्तव्य पुजाराने केलं.
'भारतीय टीमला स्वत:वर विश्वास आहे. अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळले आहेत, यामुळे त्यांचा सरावही चांगला झाला आहे. वर्ल्ड कपआधी काही सराव सामनेही आहेत, ज्याचा भारताला फायदा होईल. भारतीय टीमचं संतुलनही चांगलं आहे. आपल्या क्षमतेनुसार भारतीय टीम खेळली, तर निश्चितच त्यांचा विजय होईल', असं पुजाराला वाटतं.
पुजाराला भारतीय टीमवर विश्वास असला तरी त्याने भारतीय टीमला धोक्याचा इशाराही दिला आहे. 'इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर बॉल कमी वळला तर भारताच्या स्पिनरची अडचण होईल. अशा परिस्थितीमध्ये भारताच्या स्पिनरना विकेट घेण्यासाठी आणखी मेहनत करावी लागेल आणि बॉलिंगमध्येही बदल करावे लागतील. भारतीय स्पिनरनी मधल्या ओव्हरमध्ये विकेट घेतल्या नाहीत, तर भारताची अडचण होईल', असं पुजारा म्हणाला.
यंदाचा वर्ल्ड कप हा राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक टीम दुसऱ्या टीमसोबत एक मॅच खेळेल. यातल्या टॉप-४ टीम सेमी फायनलमध्ये जातील. सेमी फायनल जिंकणाऱ्या दोन टीममध्ये फायनल होईल. चेतेश्वर पुजाराच्या मते, 'या फॉरमॅटमुळे प्रत्येक टीमला जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळेल. जर तुम्ही जास्त मॅच खेळलात तर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये पोहोचण्याची संधी असेल'. वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी ५ जून रोजी होणार आहे.
सीएट कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा 'क्रिकेट रेटिंग्स इंटरनॅशनल अवॉर्ड' देऊन सन्मान केला. पुजारालाही यावेळी पुरस्कार देण्यात आला. ऑस्ट्रेलियात भारताला टेस्ट सीरिजमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यामुळे पुजाराला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.