मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मासोबतच्या मतभेद असल्याच्या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने पत्रकार परिषदेत म्हटलं की, आमच्यात मतभेद असते तर आम्ही चांगले खेळू शकलो नसतो.
टीम इंडियाचा वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियामध्ये फूट पडल्याच्या चर्चा जोरदारपणे सुरु होती. टीम इंडियाच्या पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये रोहित आणि विराट वेगवेगळ्या ठिकाणी उभे पाहायला मिळाले. तसेच वर्ल्ड कपमधील पराभवानंतर संपूर्ण टीम इंडिया तसेच रोहित शर्माचे कुटुंब हे स्वतंत्रपणे भारतात परतले. या सर्व मुद्द्यांवरुन टीम इंडियामध्ये आणि कोहली-विराटमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरु झाली.
रोहितने विराट आणि अनुष्का या दोघांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याने पुन्हा चर्चां रंगू लागल्या. दरम्यान रोहित-विराटमध्ये कोणतेही मतभेद नसल्याची प्रतिक्रिया टीम इंडियाचे फिल्डिंग कोच भरत अरुण यांनी दिली होती.
टीम इंडिया ३ ऑगस्टपासून विडिंज दौऱ्यावर जात आहे. याआधी टीम इंडियाने मुंबईत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत विराटने अनेक प्रश्नांची उत्तर दिली.
रोहित-विराट संबंधांवर विराट म्हणाला की, 'मी देखील अशा प्रकारच्या चर्चा ऐकत आहे. आम्ही एक टीम म्हणून गेल्या 3 वर्षांपासून चांगला खेळ करत आहोत. टीममध्ये सर्व काही आलबेल असल्याची ही पोचपावती आहे.' टीममध्ये सर्व एकमेकांवर विश्वास ठेवतात आणि आदर देखील करतात. विराट पुढे काही म्हणेल इतक्यात रवी शास्त्री यांनी त्याला रोखले.
विराटला पत्रकार परिषदेत बोलण्यापासून रवी शास्त्री यांनी रोखले. यानंतर शास्त्री यांनी माईकचा ताबा घेतला. शास्त्री आक्रमकपणे म्हणाले की, टीमपेक्षा कोणीही मोठा नाही. मग तो मी असो विराट किंवा रोहित.