मोहाली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ३५८ रन करूनही भारताचा पराभव झाला. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या पीटर हॅण्ड्सकॉम्ब(११७) आणि उस्मान ख्वाजा(९१) यांच्यामध्ये तिसऱ्या विकेटसाठी १९२ रनची पार्टनरशीप झाली. तर एश्टन टर्नरनं ४३ बॉलमध्ये नाबाद ८३ रनची आक्रमक खेळी केली. या विजयामुळे ऑस्ट्रेलियानं पाच वनडे मॅचच्या सीरिजमध्ये २-२नं बरोबरी साधली आहे.
भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनं या पराभवाचं खापर खराब फिल्डिंगवर फोडलं. शेवटच्या काही ओव्हरमध्ये आम्ही ५ संधी गमावल्या. स्टम्पिंगची संधी महत्त्वाची असते, असं विराट म्हणाला. शेवटच्या दोन वनडेमध्ये धोनीला आराम दिल्यामुळे ऋषभ पंतला टीममध्ये स्थान मिळालं आहे.
४३.१ ओव्हरमध्ये चहलच्या बॉलिंगवर ऋषभ पंतनं स्टम्पिंगची संधी गमावली. त्यावेळी टर्नर क्रीजवर होता. यानंतर नाराज क्रिकेट रसिकांनी ऋषभ पंतला ट्रोल करायला सुरुवात केली. यानंतर या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर ऋषभ पंतनं धोनीच्या अंदाजात ऍलेक्स केरीला रन आऊट करण्याचा प्रयत्न केला. ऋषभ पंतचा हा प्रयत्न फसला आणि केरीनं एक रन घेतली.
Pant's mistakes...!! pic.twitter.com/qyo9Kpkdox
— Vidshots (@Vidshots1) March 10, 2019
ऋषभ पंतच्या या कामगिरीनंतर विराट कोहलीही नाराज होता. मॅच संपल्यानंतर कोहली म्हणाला 'आम्ही मैदानामध्ये सुस्त होतो. आम्हाला संधी मिळाल्या, त्याचा फायदा घेता आला नाही. मिळालेल्या संधीचा वापर न केल्यामुळे मॅच आमच्या हातातून निसटली.'
एकीकडे ऋषभ पंतवर टीका होत असतानाच शिखर धवननं मात्र पंतची बाजू घेतली आहे. 'कोणत्याही युवा खेळाडूला तुम्हाला वेळ द्यावा लागतो. धोनी एवढे वर्ष क्रिकेट खेळला आहे. त्याच्याशी तुम्ही ऋषभ पंतची तुलना करू शकत नाही. त्यानं स्टम्पिंग केला असता तर मॅचचा निकाल वेगळा लागला असता. पण मॅच आमच्या हातातून लवकर निसटली. मैदानात असलेल्या धुक्यानंही महत्त्वाची भूमिका बजावली,' असं वक्तव्य शिखर धवननं केलं.