नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यानंतर तब्बल सात वर्षांनी मोठा खुलासा केलाय. २०व्या वर्षात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्याला लाल रंगाच्या एसजी टेस्ट चेंडूने खेळण्याचा अनुभव नव्हता.
उमेश यादवने आतापर्यंत ३३ कसोटी आणि ७० वनडे सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेय. बीसीसीआय डॉट टीव्हीला दिलेल्या माहितीत तो म्हणाला, तुम्ही लहानपणापासून क्रिकेट खेळत आहात तर तुम्हाला त्यातील अनेक गोष्टी समजतात. मात्र जर तुम्हाला अचानक वेगळे काही करण्यास सांगितले तर ते तुमच्यासाठी सोपे नसते.
मी टेनिस आणि रबराच्या चेंडूने खेळलो होतो. २०व्या वर्षापर्यंत क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूने मी खेळलो नव्हतो. सुरुवातीला मला चेंडू नेमका कुठे आणि कसा टाकायचा हे समजत नव्हते. पहिली दोन वर्षे मी याचा सराव केला. मला नेहमीच वेगवान गोलंदाज व्हायचे होते. जसजसा मी मोठा होत गेलो तसतसा मी यातील अनेक बारकावे शिकलो.
उमेशने आतापर्यंत कसोटीत ९२ तर वनडेत ९८ विकेट घेतल्यात. गेल्या वर्षभरापासून त्याने त्याच्या कामगिरीने टीकाकारांची तोंड बंद केलीत.