मुंबई : बॉल कुरतडल्याप्रकरणी वर्षभराची बंदी घालण्यात आलेले ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उप कर्णधार डेविड वॉर्नर आयपीएलच्या ११व्या हंगामात खेळणार नाहीयेत. येत्या ७ एप्रिलपासून आयपीएलच्या घमासानाला सुरुवात होतेय. स्मिथ आणि वॉर्नर यांचा सहभाग नसल्याने आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स आणि हैदराबाद सनरायजर्स संघाना मात्र मोठा फटका बसणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज स्मिथ आणि वॉर्नरबाबत निर्णय़ जाहीर केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घातलीये. तर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये.
या प्रकरणी द. आफ्रिकेत पोहोचलेले क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले होते की, स्मिथ, वॉर्नर आणि बेनक्राफ्ट आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी सिद्ध झालेत. यासाठीच त्यांना कसोटीतून बाहेर करण्यात आलेय.
ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथनं चेंडू कुरतडल्याची बाब मान्य केली आणि क्रिकेटच्या दुनियेला मोठा धक्का बसला. तिस-या कसोटीच्या तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कॅमरुन बेनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करत असल्याचं समोर आलं. तिसऱ्या दिवशी लंच सुरु असताना बॉलची छेडछाड करण्याचं वरिष्ठ खेळाडूंनी ठरवल्याचं स्मिथनं मान्य केलं. लंचमध्ये झालेल्या बैठकीत स्मिथ आणि वॉर्नर असल्यामुळे या दोघांवर कारवाई करण्यात आली.
दक्षिण आफ्रिकेच्या दुस-या डावातील ४३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर असलेला क्रिकेटपटू बेनक्रॉफ्ट बॉलशी छेडछाड करताना दिसला. बॉलला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून बॉलला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे बॉल खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येतं.
बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव पंचाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी याबाबत विचारणा केली. सुरुवातीला बेन्क्रॉफ्टनं या सगळ्या गोष्टी नाकारल्या. मात्र मैदानातील बड्या स्क्रीनवर बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव दाखवला गेला आणि तो गोंधळला. तिस-या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं बेन्क्रॉफ्टच्या बॉलशी छेडछाडीची जबाबदारी स्वीकारली.