Maharashtra Yoga Teachers Association : महाराष्ट्र राज्य योगशिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी संतोष खरटमोल यांची निवड करण्यात आली आहे. तसेच मुंबई जिल्ह्याच्या सचिव सुषमा सचिन माने यांची राज्यच्या मार्गदर्शन मंडळावर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्ती बद्दल महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी त्यांचेअभिनंदन केलेय.
योगशिक्षक संतोष खरटमोल हे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ते मुंबई आणि मुंबई बाहेर सुद्धा योगविषयी अनेक उपक्रम राबवित आहेत. महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे अनेक उपक्रम राबविण्यात सुद्धा मुंबई टीमने मदत केली आहे. याचीच पोचपावती म्हणून महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष खरटमोल यांची महाराष्ट्र योगशिक्षक संघ उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच मुंबई जिल्ह्याच्या सचिव सुषमा माने यांची महाराष्ट्र योगशिक्षक संघ, महाराष्ट्र राज्यच्या मार्गदर्शन मंडळावर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्र योगशिक्षक संघ ही संघटना महाराष्टातील योगशिक्षकांसाठी काम करणारी संस्था आहे. देशात असो वा राज्यात अशा अनेक संस्था आहेत की ते योगशिक्षक तयार करतात. मात्र, त्यांना योग्य ते मार्गदर्शन किंवा सर्टिफिकेशन झाल्यानंतर क्लास कसे घ्यायचे किंवा योगा शिकविण्याचा प्रोटोकॉल कसा असावा, साधारण फी किती अकरावी यावर सखोल माहिती महाराष्ट्र योगशिक्षक संघटना योगशिक्षकांना देत आहे.
तसेच महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्य सरकारकडे योगा शिक्षकांच्या हितासाठी काही मागण्या संघटनेने उचलून धरल्या आहेत. यात शाळा आणि महाविद्यालयात योग विषयाला सुद्धा मान्यता द्यावी, महाराष्ट्र मधील प्रत्येक जिल्ह्यात आरोग्यवर्धनी मार्फत योगसत्र घेणाऱ्या शिक्षकास नियमित करावे, शासकीय व निमशासकीय अस्थापनेमध्ये योगा ब्रेक नियमित करावा यासाठी योगतज्ज्ञ नेमावा, योग विषयास सेट (SET) परीक्षेत समावेश करावा, महाराष्ट्र पोलीस खात्यात योगशिक्षक नेमावे, जिल्हा आणि सामान्य रुग्णालयात योग थेरपिस्टच्या जागा भराव्यात, योग विषयाला पूर्णतः अनुदानित करावे, मराठी साहित्य संमेलन प्रमाणे दरवर्षी योग संमेलन शासनाने आयोजन करावे आदी बारा मागण्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ मनोज निलपवार यांनी सांगितले की, आम्ही सातत्याने आमच्या मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. सतत याचा पाठपुरावा करत आहोत. तसेच योगशिक्षकांना येणाऱ्या समस्या, त्यांना येणाऱ्या अडीअडचणींवर मात कशी करावी यावर संघटना मार्गदर्शन करत आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रच्या अनेक जिल्ह्यात योगाचा प्रचार प्रसार कसा करता येईल यावर भर दिला जात, असे त्यांनी सांगितले.