अबुधाबी : आयपीएल २०२० चा अंतिम सामना मंगळवारी दिल्ली कॅपिटल आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच दिल्ली संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ प्रथमच विजेतेपदावर नजर ठेवणार आहे. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई संघाला सलग दुसर्या वर्षी हे विजेतेपद जिंकायला आवडेल. मुंबई संघाने चार वेळा हे विजेतेपद जिंकले आहे. पण या सामन्यात पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपवरसाठी संघर्ष पाहायला मिळणार आहे.
दिल्लीचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा आणि मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यात आयपीएलच्या 13 व्या सत्रात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत स्पर्धा सुरु आहे. रविवारी दिल्ली आणि हैदराबाद यांच्यातील सामन्याआधी बुमराहकडे पर्पल कॅप होती. पण त्यानंतर रबाडाने हैदराबाद विरुद्ध 4 विकेट घेत पुन्हा पर्पल कॅप मिळवली. दिल्लीच्या वेगवान गोलंदाज रबाडाने आतापर्यंत 16 सामन्यांत 29 विकेट घेतले आहेत. तर बुमराहने 14 सामन्यांत 27 विकेट घेतल्या आहेत. फायनलमध्ये जो सर्वाधिक विकेट्स घेईल तो पर्पल कॅप मिळवणार आहे. सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत बुमराहचा सहकारी गोलंदाज ट्रेंट बाउल्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 22 विकेट्स घेतल्या आहेत.
फलंदाजीत दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन देखील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत किंग्ज इलेव्हन पंजाबचा केएल राहुल पहिल्या स्थानावर आहे. त्याने 14 सामन्यांत 670 धावा केल्या आहेत. दुसर्या क्रमांकावर शिखर धवन आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 603 धावा केल्या आहेत. हैदराबादविरुद्ध दिल्लीकडून शिखर धवनने 78 धावांची खेळी केली. मुंबईविरुद्धही, जर तो चांगली फलंदाजी करतो आणि 78 धावा करण्यात यशस्वी ठरला तर त्याला ऑरेंज कॅप मिळू शकते.