Pro Kabaddi League: बेंगळुरू बुल्सचा सलग चौथा पराभव, पुणेरी पलटणने मारली बाजी!

Puneri Paltan PKL 11: आक्रमक आणि वेगवान सुरुवात करणाऱ्या पुणेरी पलटणने शुक्रवारी प्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वात बंगळुरु बुल्सचा ३६-२२ असा तेवढाच वेगवान विजय मिळवून आपली गाडी पुन्हा रुळावर आणली. 

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 25, 2024, 10:57 PM IST
Pro Kabaddi League: बेंगळुरू बुल्सचा सलग चौथा पराभव, पुणेरी पलटणने मारली बाजी!  title=

Bengaluru Bulls vs Puneri Paltan:  सामन्याला वेगवान सुरुवात करुन सातत्याने दहा ते अकरा गुणांची आघाडी घेणाऱ्या पलटणला मध्यंतराला ९ गुणांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतरही उत्तरार्धात पलटणने पुन्हा एक सामन्याला वेग देऊन आपला झंझावात कायम राखला. चढाईपटू आणि बचावाच्या जोरावर आघाडी मोठी झाल्यावर पलटणने मोहितला वगळण्याचे धाडस केले. अर्थात, त्याचा फरक पडला नाही. पंकज मोहिते आणि आकाश शिंदे यांनी पलटणच्या चढाईची जबाबदारी चोख सांभाळली. 

दुसरीकडे बंगळुरुला आज चढाईपटूंकडून अजिबात साथ मिळाली नाही. त्यांचे हुकमा अस्त्र ठरु शकणाऱ्या कर्णधार परदीप नरवालला पहिल्या तीन चढायातील अपयशानंतर राखीव खेळाडू बसविण्याची वेळ बंगळुरुवर आली. अजिंक्य पवार आणि पंकजलाच चढाईत गुण मिळवता आले. सौरभ नंदाल आण नितिन रावलच्या बचावामुळे बंगळुरुला थोडाफार प्रतिकार करता आला. पलटणने आज संघातील प्रत्येक खेळाडूवर विश्वास दाखवला. त्यामुळे मोहित गोयत, पंकज मोहिते, आकाश शिंदे आणि अस्लम इनामदार या प्रत्येक चढाईपटूंनी गुणांची चांगली कमाई केली. त्यांची आघाडी पुन्हा एकदा गौरव खत्री आणि अमन अंतिलच्या भेदक बचावांनी वाढली. दोघांनी प्रत्येकी चार गुणांची कमाई केली. 

तत्पूर्वी, पलटनने पूर्वार्धात झंझावती सुरुवात केली होती. मोहित गोयतच्या हुकमी चढायांनी पहिल्या पाच मिनिटांत धुमाकूळ घातला होता. गौरव खत्री आणि अमनने केलेल्या पकडींची सुरेख साथ मिळाल्याने या पाच मिनिटांतच पलटणने बंगळुरु बुल्सवर पहिला लोण दिला होता. पलटणने ९ गुण झाले तेव्हा बंगळुरुचा पहिला गुण नोंदला गेला. त्यानंतर मोहितच्या चढाया पलटणची गुणसंख्या आणि आघाडी वाढवत होत्या. चढाईपटू चालत नाहीत म्हटल्यावर बंगळुरुने बचावावर आणि तीन खेळाडूंतच खेळण्याचे नियोजन अवलंबले. याचा फायदा त्यांनी करुन घेतला. एकामागून एक तीन अव्वल पकडी करून बंगळुरुने पलटणसमोर आव्हान उभे केले. एकवेळ १० ते १२ गुणांची पलटणची आघाडी मध्यंतराला १८-११ अशी ७ गुणांवर मर्यादित राहिली होती.