RCB IPL 2024 Playoffs Equation: यंदाची आयपीएल रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या टीमसाठी फार वाईट जाताना दिसतेय. ही टीम 8 सामन्यांपैकी 7 सामने पराभूत झाली आहे. केवळ एका सामन्यात विजय मिळवल्यानंतर फाफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली असलेली बंगळूरूची टीम पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजे 10 व्या स्थानावर आहे. अशातच आता बंगळूरू प्लेऑफमधून बाहेर गेल्याचं म्हटलं जातंय. मात्र अजूनही आरसीबीकडे प्लेऑफ गाठण्याची संधी आहे का, यावर नजर टाकूया.
आयपीएल 2024 मध्ये बंगळूरूने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना फक्त एकच विजय मिळवता आला आहे. एकाकी विजयासह RCB 2 गुण आणि -1.046 च्या नेट रनरेटमुळे पॉईंट्स टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत 10व्या स्थानावरून थेट टॉप 4 मध्ये पोहोचणं आरसीबीच्या टीमसाठी सोपं नसणार आहे. आरसीबी अजूनही प्लेऑफच्या शर्यतीसाठी पात्र ठरू शकेल का? जाणून घेऊया.
सर्वप्रथम म्हणजे, प्लेऑफमध्ये स्थान मिळवणं आता आरसीबीच्या हाताबाहेर गेल्यात जमा आहे. म्हणजेच आता त्यांना इतर टीम्सच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. आरसीबीकडे या सिझनमध्ये अजून 6 सामने खेळायचे आहेत. जर टीमने सर्व सामने जिंकले तर त्यांचे एकूण 14 पॉईंट्स होतील. प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी कोणत्याही टीमला किमान 16 पॉईंट्सची आवश्यकता असते. आयपीएलच्या गेल्या सिझनमध्ये RCB ने 14 गुण मिळवले होते. त्यामुळे ते प्लेऑफसाठी पात्र ठरू शकले नाही.
यंदाच्या आयपीएलच्या सिझनमध्ये प्लेऑफ गाठण्यासाठी आरसीबीला आधी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहे. जर टीमने उर्वरित सामन्यांपैकी एकही गमावला तर त्यांना पात्रता मिळणं अशक्य होईल. सर्व सामने जिंकल्यानंतर, टीमला आशा करावी लागेल की, इतर टीमचे निकाल आपल्या बाजूने लागणार आहे. जेणेकरून ते 14 गुणांसह टॉप-4 मध्ये स्थान मिळवू शकतील. त्यामुळे आता आरसीबी प्लेऑफ गाठणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताने बंगळुरुसमोर 222 रन्सचा डोंगर उभा केला होता. बंगळुरु संघाने आव्हानाचा पाठलाग करताना कडवी झुंज दिली. पण अखेरच्या क्षणी एका धावेमुळे त्यांनी सामना गमावला. या सामन्यात विराटच्या विकेटवरुन अंपायरशी वाद घालण्यात आला होता. दरम्यान भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून विराट कोहलीला मोठी शिक्षा सुनावली आहे. विराटला मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. विराटला बीसीसीआयने आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं असून त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.