कराची : पाकिस्तानला हॉकी वर्ल्ड कप जिंकवून देणारे गोलकीपर मन्सूर अहमद यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून मन्सूर अहमद हृदयाच्या आजारानं त्रस्त होते. हृदय प्रत्यारोपणासाठी भारतात येण्याची विनंतीही त्यांनी भारत सरकारला केली होती. पाकिस्तान सरकारनं त्यांना पाकिस्तानमध्येच मॅकेनिकल हार्ट ट्रान्सप्लांट करायला सांगितलं होतं पण मन्सूर अहमद यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. अहमद यांनी हा प्रस्ताव स्वीकारला असता तर पाकिस्तानमधली ही अशाप्रकारची पहिली शस्त्रक्रिया ठरली असती. मन्सूर अहमद हे गेल्या तीन वर्षांपासून आजारी होते. २०१६ साली मन्सूर यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. पण या वर्षाच्या सुरुवातीपासून पुन्हा ते आजारी पडले. चेन्नईमध्ये येऊन मन्सूर यांना हृदय प्रत्यारोपण करायचं होतं. चेन्नईच्या फोर्टिस मलार हॉस्पिटलचे डॉक्टर कोमरक्षी बालकृष्णन यांनी मन्सूर यांच्या फाईल बघितल्या होत्या. तसंच लगेच भारतात आलात तर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी करू, असं आश्वासनही बालकृष्णन यांनी मन्सूरना दिलं होतं.
१९९४ साली पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या खेळाडूंपैकी मन्सूर एक होते. वर्ल्ड कप फायनलच्या पेनल्टी शूट आऊटमध्ये मन्सूर यांनी गोल होण्यापासून वाचवत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. मन्सूर यांनी पाकिस्तानकडून ३३८ आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या होत्या.