MS Dhoni Ranchi Home Issue: भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा इंडियन प्रिमिअर लीगचा चषक जिंकून देणारा महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळेस धोनी गृहराज्य असलेल्या झारखंड सरकारच्या तावडीत सापडणार असं चित्र दिसत आहे. झारखंडमधील राज्य गृहिनिर्माण विभागाकडून धोनीच्या रांचीमधील घरावर जप्ती येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. नेमकं घडलंय काय आणि हे प्रकरण काय आहे पाहूयात...
महेंद्रसिंह धोनीचा रांचीमधील हामरु हाऊसिंग कॉलिनीमध्ये एक घर आहे. या घराचा वापर आर्थिक उलाढालीसाठी म्हणजेच कमर्शिअल कारणांसाठी करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणामध्ये चौकशी करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाने दिले आहेत. या प्रकरणामध्ये तथ्य आढळून आल्यास धोनीचं घरावर जप्ती येणार का याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे. मात्र या प्रकरणामध्ये तथ्य आढळल्यास आधी धोनीला नोटीस पाठवली जाईल असं अधिकाऱ्यांकडून सागण्यात येत आहे. धोनीचं हे घर ज्या जमीनीवर आहे ती जमीन त्याला भेट म्हणून मिळालेली आहे. त्यामुळेच गृहनिर्माण विभागाच्या नियमानुसार अशा जमीनीवर उभारण्यात आलेल्या कोणत्याही वास्तूचा वापर कमर्शिअल कामासाठी करता येत नाही. असं करणं हा कायद्याने गुन्हा समजला जातो.
झारखंडमधील गृहनिर्माण विभागाने या प्रकरणात अनेक तक्रारी समोर आल्यानंतर चौकशी सुरु केल्याची माहिती, 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिली आहे. झारखंड सरकारने बक्षीस म्हणून धोनीला हामरु हाऊसिंग कॉलीनीमधील जमीनीचा तुकडा दिला होता. अशी सरकारकडून भेट दिली जाणारी जमीन केवळ राहण्यासाठी वापरता येते. अशा जागा कमर्शिअल गोष्टींसाठी वापरण्याची परवानगी नसते. अनेक तक्रारींनुसार धोनी या ठिकाणी पॅथलॉजी सेंटर उभारण्याच्या तयारीत आहे. या ठिकाणी या पॅथलॉजी सेंटरचा बोर्डही दिसत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सातत्याने होत असलेल्या आरोपांनंतर हा बोर्ड हिरव्या कापडाने झाकण्यात आला आहे.
नक्की वाचा >> Vinod Kambli च्या Medical Report मधून धक्कादायक खुलासा! मेंदूमध्ये...; रुग्णालयाचा मोठा निर्णय
धोनी त्यांच्याकडील या संपत्तीवरुन वादात आल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2015 मध्ये झारखंड गृहनिर्माण विभागाने धोनीला देण्यात आलेल्या जमीनीच्या बाजूला बेकायदेशीरपणे जमीनीवर ताबा मिळवल्याच्या मुद्द्यावरुन नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावेळेच या जमीनीच्या मालकीवरुन प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा या जमीनीवरील घरावरुन धोनी वादात सापडला आहे.