जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये जसप्रीत बुमराहनं टेस्ट क्रिकेटमध्ये आगमन केलं. या सीरिजमध्ये बुमराहनं उल्लेखनीय कामगिरी केली. पण तरीही वेस्ट इंडिजचे दिग्गज माजी फास्ट बॉलर मायकल होल्डिंग यांनी बुमराहविषयी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. बुमराह नव्या बॉलनं किती चांगली बॉलिंग करेल, याविषयी माझ्या मनात शंका असल्याचं होल्डिंग म्हणालेत.
नव्या बॉलनं बुमराह उजव्या हाताच्या बॅट्समनना स्टंपपासून लांब बॉलिंग करतो. त्यामुळे परदेशातल्या खेळपट्ट्यांवर बुमराह नाही तर भुवनेश्वर कुमार माझी पहिली पसंत असेल, अशी प्रतिक्रिया मायकल होल्डिंगनी दिली आहे.
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या खेळपट्ट्यांमध्ये बराच फरक आहे. भारत जेव्हा इंग्लंडमध्ये खेळेल तेव्हा खेळपट्ट्या पूर्णपणे वेगळ्या असतील. त्यामुळे मी बुमराहला खेळवणार नाही. बुमराह बॉल फेकतो. इंग्लंडमध्ये बॉल स्विंग करणारा बॉलर भारताला लागेल, असं वक्तव्य होल्डिंग यांनी केलं आहे.
बुमराह जोरात बॉल फेकतो त्यामुळे त्याला सेंच्युरिअन टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये दोन विकेट आणि जोहान्सबर्गमध्ये ५ विकेट मिळाल्या. बुमराह फास्ट बॉलिंग करतो तेव्हा खेळपट्टी मदत करत असेल तर बॉल खाली-वरती राहतो, अशावेळी बॅट्समनला प्रतिक्रिया द्यायला वेळ नसतो, असं होल्डिंग म्हणालेत.
७० आणि ८० च्या दशकामध्ये मोठमोठे दिग्गज बॅट्समन होल्डिंगच्या बॉलिंगला अक्षरश: घाबरायचे. ६० टेस्ट खेळणाऱ्या होल्डिंग यांनी २४९ विकेट घेतल्या. क्रिकेटमधून संन्यास घेतल्यावर होल्डिंग आता कॉमेंट्री करतात. जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर होल्डिंग यांनी टीका केली होती. या खेळपट्टीला होल्डिंगनी १० पैकी २ मार्क दिले होते.