नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश क्रिकेटमध्ये एक-मेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, असे असले तरी एका भारतीय क्रिकेटरने पाकिस्तानमधील मुलींना याड लावल्याचं समोर आलं होतं.
माजी भारतीय क्रिकेटर लक्ष्मीपती बालाजी याचा जन्म २७ सप्टेंबर रोजी झाला. २००३-२००४ साली भारताने केलेल्या पाकिस्तान दौऱ्यात सचिन तेंडुलकर आणि सेहवाग यांच्यासारख्या स्टार प्लेअर्समध्ये बालाजीने आपली एक जागा बनवली. त्यानंतर भारतातच नाही तर पाकिस्तानातही त्याचे चाहते निर्माण झाले.
बालाजीचा जन्म २७ सप्टेंबर १९८१ रोजी झाला. त्याने पाकिस्तान विरोधात ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये १२ विकेट्स घेतले. भारताने ही सीरिज २-१ ने जिंकली होती. शोएब अख्तच्या बॉलिंगवर बालाजीने सिक्सर लगावल्यानंतर सचिन तेंडुलकरने आणि त्यावेळचे कोच जॉन राइट यांनीही बालाजीच्या बॅटिंगचं कौतुक केलं होतं.
भारत-पाकिस्तान यांच्यातील सीरिजमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या बालाजीने २४ मार्चला वन-डे सीरिजच्या पाचव्या मॅचमध्ये शोएब अख्तरच्या बॉलिंगवर सिक्सर लगावला. तसेच या मॅचमध्ये बालाजीने तीन विकेट्स घेतले. यानंतर टीम इंडियासाठी आयोजित करण्यात आलेल्या टी-पार्टीत पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी बालाजीचं कौतुक केलं होतं.
२००४ साली भारतीय क्रिकेट टीमने पाकिस्तान दौऱ्यात जबरदस्त प्रदर्शन दाखवत भारतीयांनाच नाही तर पाकिस्तानमधील चाहत्यांनाही भूरळ घातली होती. त्यावेळी पाकिस्तानमधील मुली 'Will you marry me' असे बोर्ड घेऊन मैदानात बालाजीला प्रपोज करत असतं.
बालाजीने एका मुलाखतीत सांगितले होते की, "बालाजी जरा धीरे चलो, बिजली खडी, यहां बिजली खडी..." हे गाणं मुली जोर-जोराने बोलत असतं. मलाही हे सर्व खूप आवडत होतं आणि माझे सहकारीही माझ्याकडे पाहून हसत होते.