Major records break in IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगचा सतरावा हंगाम आता संपलाय. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) जेतेपद आपल्या नावावर केलंय. रविवारी झालेल्या आयपीएलच्या मेगाफायनलमध्ये (IPL MegaFinal) केकेआरने सनरायजर्स हैदराबादचा 8 विकेटने पराभव केला. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं हे तिसरं जेतेपद ठरलं आहे. याआधी केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावलं होतं.
कमी धावसंख्येचा अंतिम सामना
आयपीएल 2024 अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादने (SRH) टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सनरायजर्सचा संघ अवघ्या 113 धावात ऑलआऊट झाला. विजयाचं हे सोप आव्हान केकेआरने 2 विकेट गमावत 10.3 षटकात पुर्ण केलं आणि आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आयपीएल अंतिम सामन्याच्या इतिहासत हैदराबाद सर्वात कमी धावसंख्या बनवणारा संघ ठरला आहे. याबरोबच यंदाच्या आयपीएल हंगामात अनेक रेकॉर्ड्स रचले गेले आहेत.
सर्वाधिक वेळा 200+ धावसंख्या
आयपीएलमध्ये आता 170, 180 ही धावसंख्या आता मागे पडली आहे. आता जवळपास सर्वच संघ 200 धावांचा टप्पा पार करण्याचा प्रयत्न करतात. यंदाच्या हंगामात तर 200 हून अधिक धावसंख्या करण्याचा विक्रमच नोंदवला गेला आहे. तब्बल 41 वेळा 200 किंवा त्याहून जास्त धावसंख्या नोंदवली गेली आहे.
यात कोलकाता नाईट रायडर्स, सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सर्वात पुढे होते. या संघांनी प्रत्येकी 6 वेळा 200 किंवा त्याहून जास्त धावा केल्या आहेत. तर तीन संघांनी 250 धावांचा टप्पा पार केलाय.
यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार
षटकारांसाठी हा हंगाम क्रिकेटप्रेमींच्या कायम लक्षातर राहिल. या आयपीएल हंगामात फलंदाजांनी षटकारांची अक्षरश बरसात केली. आयपीएलच्या याआधीच्या हंगामापेक्षा या हंगामात सर्वाधिक षटकार नोंदवले गेले आहेत. या हंगामात अभिषेक शर्माने सर्वाधिक 42 षटकार लगावले. तर एकूण 1260 षटकारांची नोंद झाली. गेल्या हंगामात 1124 लगावले गेले होते.
या हंगामात सर्वाधिक शतकवीर
आयपीएलच्या या हंगामात एकूण 14 शतक लगावले गेले. कोणत्याही हंगामापेक्षा ही संख्या जास्त आहेत. राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने सर्वाधिक दोन शतकं लगावली. तर 12 खेळाडूंनी प्रत्येकी एक शतक लगावलं. यात ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, जॉनी बेयरस्टो, ट्रेविस हेड, सूर्यकुमार यादव, विल जॅक्स, यशस्वी जायसवाल, सुनील नरेन, साई सुदर्शन, शुभमन गिल, रोहित शर्मा आणि मार्कस स्टोइनिस यांचा समावेश आहे.
IPL इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या
यंदाच्या हंगमात सर्वोच्च धावसंख्येचाही नवा विक्रम नोंदवला गेला आहे. अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबदला मोठा स्कोर करता आला नाही, पण लीग सामन्यात हैदराबादची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या एका सामन्यात तब्बल 277 धावा केल्या. यामुळे 11 वर्षांपूर्वी आरसीबीने केलेल्या 263 धावांचा विक्र मोडला गेला.
विजयाचं मोठं आव्हान पार
यंदाच्या आयपीएल हंगामात विजयाचं सर्वात मोठं आव्हान करण्याचाही विक्रम झाला. कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 262 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाब किंग्सने हे आव्हान 8 चेंडू बाकी असताना पार केलं.