IPL 2023 RCB Virat Kohli Request Fans: भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली 2 महिन्यांच्या ब्रेकनंतर भारतात परला आहे. तब्बल 2 महिन्यांहून अधिक काळानंतर कोहली चाहत्यांना क्रिकेटच्या मैदानामध्ये दिसला. बंगळुरुच्या सराव शिबीरामध्ये कोहली सहभागी झाला आहे. मंगळवारी बंगळुरुमधील एम. चेन्नस्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या अनबॉक्स कार्यक्रमामध्येही विराट हजर होता. विराटने जानेवारी महिन्यापासून सुरु झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेमधून ब्रेक घेतला होता. पत्नी अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर असल्याने बाळाच्या जन्मासाठी दोघेही परदेशात गेले होते.
विराट हा फेब्रवारी महिन्यात दुसऱ्यांदा वडील झाला. अनुष्काने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. विराट या ब्रेकनंतर आयपीएल 2024 च्या पर्वपूर्वी आरसीबीच्या संघाच्या सराव शिबीरात सहभागी झाला आहे. बंगळुरुमध्येच आयोजित आरसीबी अनबॉक्स कार्यक्रमासाठी विराट जेव्हा हॉलमध्ये दाखल झाला त्याला पाहून उपस्थित चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तब्बल 2 महिन्यांनंतर विराट पहिल्यांदाच चाहत्यांमध्ये दिसून आला. यावेळेस विराटची ओळख करुन देताना समालोचक डॅनिश सितने किंग कोहली असा उल्लेख केला. यानंतर सभागृह किंकाळ्या, टाळ्या आणि शिट्यांच्या आवाजाने दाणाणून गेलं.
चाहत्यांचा उत्साह एवढा होता की विराटला बोलण्यापुरती शांतताही चाहत्यांकडून उपलब्ध करुन दिली जात नव्हती. अखेर गोंगाट सुरु असतानाच विराटने बोलण्यास सुरुवात केली. "आम्हाला चेन्नईला तातडीने जायचं आहे. आमचं चार्टड प्लेन आहे. त्यामुळे आमच्याकडे फारसा वेळ नाहीये. सर्वात आधी तुम्ही मला त्या नावाने (किंग कोहली) हाक मारणं बंद करा," अशी विनंती विराटने डॅनिशकडे केली. 'मी फॅफ ड्युप्लेसिसला तेच सांगत होतो की, मी कुठेही जातो आणि माझा उल्लेख त्या शब्दाने (किंग) केला जातो तेव्हा मला फार अवघडल्यासारखं होतं. त्या नावाने उल्लेख केल्यानंतर चाहते जसा प्रतिसाद देतात त्यामुळेही मी गोंधळतो. त्यामुळे कृपा करुन मला यापुढे विराट म्हणा. कृपया तो शब्द वापरु नका. मला फार अवघडल्यासारखं होतं,' असं विराट म्हणाला.
God of masses @imvkohli pic.twitter.com/XtQ0NX6jLz
— ` (@chixxsays) March 19, 2024
विराटला प्रेमाने त्याच्या चाहत्यांनी किंग हे विशेषण दिलं आहे. अनेक समालोचकही विराट कोहलीची कामगिरी आणि आकडेवारी पाहून त्याला किंग नावाने बोलवतात.