IPL 2022: दारुच्या नशेत मला 15 व्या मजल्यावर लटकवलं, या खेळाडूचा खळबळजनक दावा

एका दारुड्या क्रिकेटरने माझ्या हत्येचा प्रयत्न केला होता, खेळाडूच्या दाव्याने क्रिकेट जगतात खळबळ

Updated: Apr 8, 2022, 01:28 PM IST
IPL 2022: दारुच्या नशेत मला 15 व्या मजल्यावर लटकवलं, या खेळाडूचा खळबळजनक दावा title=

Yuzvendra Chahal IPL 2022 : संघात आणि सहकारी खेळाडूंबरोबर नेहमी विनोद करण्यासाठी ओळखला जाणार भारतीय संघाचा लेगस्पिनर यजुवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) एक खळबळजनक दावा केला आहे. 9 वर्षांपूर्वी म्हणजे 2013 आयपीएल सामन्यानंतर एका खेळाडूने त्याला मद्यधुंद अवस्थेत 15 व्या मजल्यावरच्या बाल्कनीतून लटकवलं. थोडीशी जरी चूक झाली असती तरी माझा जीव गेला असता असं खुलासा चहलने केला आहे.

31 वर्षीय चहल आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळतोय. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनशी (R Ashwin) बोलताना त्याने हा खुलासा केला आहे. त्याचा व्हिडिओ राजस्थान फ्रँचायझीने स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. चहल आणि अश्विनसोबत करुण नायरही (Karun Nayar) या व्हिडिओत दिसतोय.

चहलची 15 व्या मजल्यावरील बाल्कनीत लटकावलं
2013 मध्ये मी मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indians) होतो आणि आमची मॅच बंगळुरूमध्ये होती. सामना संपल्यानंतर गेट टूगेदर झाला. एक खेळाडू होता जो खूप नशेत होता. मी त्याचे नाव घेणार नाही. तो कितीतरी वेळ माझ्याकडे बघत होता. त्यानंतर त्याने मला बोलावलं आणि उचलून बाल्कनीतून लटकवले. मी माझ्या हाताने त्याचं डोकं धरुन ठेवलं होतं. माझे हात सुटले असते तर पंधराव्या मजल्यावरून थेट खाली पडलो असतो असं चहलने म्हटलं आहे. 

'त्या दिवशी मरता-मरता वाचलो'
त्यावेळी तिकडे असलेल्या काही खेळाडूंनी बालकनीत धाव घेतली आणि परिस्थिती आटोक्यात आणली. पण माझी अवस्था बेशुद्ध असल्यासारखी झाली होती. त्यानंतर काही खेळाडूंनी मला पाणी प्यायला दिलं. या घटनेनंतर आपण कुठे गेल्यावर किती जबाबदारीने राहिला हवं हे मला समजलं. माझ्या आयुष्यातला हा सर्वात भीतीदायक प्रसंग होता, असंही चहलने म्हटलं.

आरसीबीने केलं नाही रिटेन
गेल्या आयपीएल हंगामापर्यंत चहल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) कडून खेळत होता. पण यंदाच्या हंगामात आरसीबीने चहलला रिटेन केलं नाही. आयपीएच्या पंधराव्या हंगामासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात राजस्थान रॉयल्सने 6.50 कोटी रुपयांची बोली लावून चहलला आपल्या संघात घेतलं. चहल आयपीएलमध्ये बेंगळुरू, राजस्थान व्यतिरिक्त मुंबई इंडियन्सकडूनही खेळला आहे.