मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा वन डे सामना आज पुण्यात खेळला जात आहे. वन डे सीरिजमध्ये भारतीय संघाने 66 धावांनी इंग्लंडवर विजय मिळवत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या वन डे सीरिजदरम्यान IPLमधील दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि भारतीय संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर गंभीर जखमी झाला. श्रेयसच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे.
या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर वन डे सीरिज आणि IPLचे सामने खेळू शकणार नाही. तर संपूर्ण IPL तो मैदानापासून दूर राहिल अशीही चर्चा आहे. त्याच्या प्रकृतीचा विचार करता दिल्ली कॅपिटल्सची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची असा पेच निर्माण झाला होता. दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदासाठी 5 दावेदार होते मात्र त्यापैकी ऋषभ पंत आणि अजिंकय राहाणे यांच्यात मोठी स्पर्धा होती.
दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा ऋषभ पंतकडे देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. रिकी पॉन्टिंग यांनी या संदर्भात अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. मात्र ऋषभकडे कर्णधारपद गेल्याच्या चर्चा सुरू आहेत. रिकी पॉन्टिंग यांनी ऋषभला पसंती दिल्याची चर्चा आहे.
ऋषभ पंतची भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 आणि कसोटी सामन्यातील कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे आता याचा फायदा IPLसाठी होऊ शकतो. 9 एप्रिलपासून 30 मेपर्यंत IPLचे सामने खेळवले जाणार आहेत. त्या आधी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधारपदाची कमान कोणाच्या खांद्यावर जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.