Diksha Dagar Car Accident : पॅरिस ऑलिम्पिकमधून आज मराठमोळ्या स्वप्निल कुसाळे कांस्यपदक मिळालं. पॅरिसमधून गुड न्यूज समोर असताना आता एक धक्कादायक बातमी देखील समोर आली आहे. भारतीय गोल्फपटू दीक्षा डागर हिचा पॅरिसमध्ये अपघात झाला आहे. हा अपघात 30 जुलै रोजी झालाय. मात्र, सुदैवाने दीक्षा डागरला फार दुखापत झाली नसून ती सुरक्षित असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. तर तिचं कुटुंब अजूनही रुग्णालयात असल्याने दीक्षाला धक्का बसला आहे.
मंगळवारी संध्याकाळी दीक्षा डागर तिच्या आई-वडिलांसोबत आणि भावासोबत प्रवास करत होती. कारमधून प्रवास करत असताना अपघात झाला. त्यावेळी तिचं संपूर्ण कुटुंब जखमी झालं. दीक्षाला किरकोळ दुखापत झाली असली तरी तिच्या आईच्या पाठीला दुखापत झालीये. त्यानंतर सर्वांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. दीक्षाच्या वडिलांना आणि भावाला देखील दुखापत झाली होती. अशातच आता उपचार सुरू असून दीक्षाचं कुटुंब सुरक्षित असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता सर्वांनी सुटकेचा श्वास घेतलाय.
दीक्षाला लहानपणापासून गोल्फ खेळण्याची आवड निर्माण झाली होती. 2018 मध्ये तिने व्यावसायिक गोल्फ खेळण्यास सुरूवात केली होती. त्यानंर तिने लेडीज युरोपियन टूरचे विजेतेपद पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती सर्वात तरुण भारतीय आणि एकूणच फक्त दुसरी भारतीय खेळाडू ठरली होती. डावखुऱ्या असलेल्या दीक्षाने अनेक परिस्थितीवर मात करत आपली ओळख निर्माण केलीये.
Breaking news- @DikshaDagar in a car accident in Paris on Tuesday night. She is not injured & will play as planned next week at @Paris2024 @Olympics . Father Col Dagar & Diksha fine, also brother. Mother suffered some injuries; being taken care off . @LETgolf File photo pic.twitter.com/2Kpmx2WSNo
— V Krishnaswamy (@Swinging_Swamy) August 1, 2024
दरम्यान, गोल्फर दीक्षा डागर हिने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. दक्षिण आफ्रिकेची गोल्फर पॉला रेटोने माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिक्षाला टोकियो 2020 मध्ये शेवटच्या क्षणी प्रवेश मिळाला. पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यावर दीक्षाचे लक्ष असेल. दीक्षा ही एकमेव गोल्फर आहे जी ऑलिम्पिक आणि डेफलिम्पिक या दोन्ही खेळांचा भाग आहे. त्यामुळे तिच्याकडून भारतीयांना अपेक्षा आहेत.