Sanju Samson Father Comment: भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विक्रमी शतक झळकावणाऱ्या संजू सॅमसनला तिसऱ्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे सलग दोन सामन्यांमध्ये दोन शतकं लगावणारा पहिलाच भारतीय ठरल्याच्या दुसऱ्याच सामन्यात संजूच्या नावावर एकाच वर्षात पाच वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रमही नोंदवला गेला आहे. मात्र असं असलं तरी संजूची फलंदाजी मागील काही सामन्यांमध्ये फारच तडाखेबाज झाल्याचं पाहायला मिळालं. असं असतानाही संजूच्या वडिलांनी त्याच्यावर टीका होत असल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी थेट 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील सदस्यावर निशाणा साधला आहे.
संजूचे वडील सॅमसन विश्वनाथ हे दिल्ली पोलिसचे हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी दिल्लीकडून संतोष ट्रॉफी फुटबॉल चषक स्पर्धा खेळली आहे. मात्र त्यांनी मुलाला क्रिकेट खेळता यावं म्हणून अनेक गोष्टींना तिलांजली दिली. यामध्ये त्यांच्या नोकरीचाही समावेश आहे. केरळमधील एका मल्याळम प्रसारमाध्यमाला विश्वनाथ यांनी दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत विश्वनाथ यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. "भारतीय टीम मॅनेजमेंटने माझ्या मुलाच्या करिअरची 10 वर्ष वाया घालवली," असं विश्वानाथ यांनी म्हटलं आहे. मात्र त्यावेळी, "माझा मुलगा ही कसर आगामी काही वर्षांममध्ये नक्की भरुन काढेन," असंही विश्वानाथ यांनी टी-20 मालिकेचा संदर्भ देत म्हटल्याचं दिसत आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी एका दिग्गज माजी क्रिकेटपटूवरही टीका केली आहे.
संजूच्या वडिलांनी 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य तसेच बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते कृष्णमचारी श्रीकांत यांच्यावरही टीका केली आहे. "तामिळनाडूच्या खेळाडूबद्दल त्यांनी (श्रीकांत यांनी) नोंदवलेल्या प्रतिक्रियांमुळे मी फार दुखावलो. ते किती क्रिकेट खेळलेत मला ठाऊक नाही. आजपर्यंत हा माणूस माझ्या मुलाबद्दल काही चांगलं, प्रेरणा देणारं बोललेला नाही. त्यांनी त्यांच्या शब्दांनी माझ्या मुलाला फार दुखावलं आहे," असा दावा विश्वनाथ यांनी केला आहे.
नक्की वाचा >> भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप! संजू सॅमसनचे वडील म्हणाले, 'द्रविड, धोनी, रोहित, विराटने माझ्या...'
"ते (श्रीकांत) काय म्हणाले की संजूने कोणाविरुद्ध शतक झळकावलं आहे तर बांगलादेशविरुद्ध! अनेकजण म्हणतात की ते उत्तम खेळाडू होता मात्र मी त्यांना कधी खेळताना पाहिलं नाही. शतक हे शतक असतं. त्यांनी स्वत: बंगलादेशविरुद्ध 26 धावा केल्या आहेत. संजूने शतक झळकावलं असून सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडसारख्या खेळाडूंसारखा तो दर्जेदार क्रिकेटपटू आहे. किमान त्याचा तरी सन्मान त्यांनी (श्रीकांत यांनी) राखला पाहिजे," अशी अपेक्षा विश्वनाथ यांनी व्यक्त केल्याचं या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. मात्र या व्हायरल व्हिडीओच्या सत्यतेची पुष्टी 'झी 24 तास' करत नाही.