मुंबई : भारतीय वनडे क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (२० जून) बंगळुरूमध्ये यो-यो फिटनेस टेस्टमध्ये सहभागी होणार आहे. जर या यो-यो टेस्टमध्ये रोहित शर्माला १६.१ इतका निर्धारित स्कोर करता आला नाही तर त्याच्या जागी कसोटीचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला संधी मिळू शकते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्याय म्हणून कोणासही तयार राहण्यास सांगितलेले नाहीये. जर गरज पडली तर रहाणेला रिझर्व्ह सलामी फलंदाज म्हणून ठेवण्यात आला असून तो ही भूमिका निभावेल.
इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंची १५ जूनला यो-यो टेस्ट घेण्यात आली होती. या टेस्टमध्ये रोहित शर्माने भाग घेतला नव्हता. रोहित शर्मा एका घडाळ्याच्या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसिडेर म्हणून रशियात होता त्यामुळे तो उपस्थित राहू शकला नव्हता.
कर्णधार विराट कोहलीशिवाय वनडेमध्ये रोहित शर्मा महत्त्वाचा क्रिकेटर आहे आणि आगामी इंग्लंड दौऱ्यात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची ठरु शकते.
बीसीसीआयच्या संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माला इंग्लंडला पोहोचल्यावर फिटनेस टेस्ट द्यायची होतीय मात्र बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले की ही टेस्ट भारतातच देणे गरजेचे आहे. याआधी झालेल्या यो-यो टेस्टमध्ये मोहम्मद शामी, अंबाती रायडू, वॉशिंग्टन सुंदर आणि संजू सॅमसन फेल झाले होते.