Team India: भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आता टी-20 आणि वनडे सिरीज खेळवली जाणार आहे. यासाठी भारताची टी-20 टीम श्रीलंकेला पोहोचली आहे. यावेळी टी-20 फॉर्मेटचं नेतृत्व सूर्याकुमार यादव करणार आहे. पहिल्यांदाच मुख्य कोच गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार आहे. गंभीरच्या नुकत्याच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली अजून वनडे क्रिकेट खेळू शकतात, असं म्हटलं होतं. त्यामुळे जर हे खेळाडू फीट राहिले तर 2027 चा वर्ल्डकपही खेळू शकणार आहेत. मात्र गंभीरच्या या निर्णयावर टीम इंडियाचे माजी खेळाडू कृष्णम्माचारी श्रीकांत असहमत असल्याचं दिसून आलं.
टीम इंडियाचे माजी खेळाडू श्रीकांत यांनी एका युट्यूब शोमध्ये रोहित शर्माच्या फिटनेसवरून प्रश्न उपस्थित केल्याचं दिसून आलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्माने 2027 चा वर्ल्डकप खेळू नये.
श्रीकांत त्यांच्या मुलासोबत एका युट्यूब चॅनेलशी बोलताना म्हणाले की, विराट कोहली एक चॅम्पियन खेळाडू आहे. तर रोहित शर्माने 2027 चा वर्ल्डकप खेळू नये. तो दक्षिण आफ्रिकेमध्ये बेशुद्ध पडेल. दरम्यान श्रीकांत यांचं हे विधान सोशळ मीडियावर व्हायरल झालं आहे. यावेळी रोहितचे चाहते माजी खेळाडू श्रीकांत यांच्यावर टीका करतायत.
श्रीकांत यांनी आयपीएल 2024 दरम्यान सांगितलं होतं की, रोहित शर्माने त्याचं नाव बदलून नो हिट शर्मा ठेवावं. खरंतर रोहित शर्माची बॅट त्यावेळी फारशी चांगली कामगिरी करू शकलेली नव्हती. त्यामुळेच श्रीकांत यांनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मात्र, रोहित शर्माने २०२४ च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
2011 मध्ये ज्यावेळी टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी टीमचे मुख्य सिलेक्टर के. श्रीकांत होते. श्रीकांत यांनी तेव्हा मोठा निर्णय घेत रोहित शर्माला वर्ल्ड कप संघातून वगळलं. त्याच्या जागी युसूफ पठाणला संधी मिळाली. श्रीकांत नेहमी रोहित शर्माविरुद्ध सतत वक्तव्यं करत असतात आणि मोठी गोष्ट म्हणजे हिटमॅन त्यांना अनेकदा चुकीचे सिद्ध करतो.