Delhi Capitals vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात विशाखापट्टनमच्या वाय एस राजशेखर रेड्डी एसीए विडीसीए क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा 13 वा खेळवला गेला. या सामन्यात दिल्लीने दिलेल्या 192 धावांचं आव्हान पूर्ण करताना चेन्नईला केवळ 171 धावा करता आल्या. अखेरच्या 2 ओव्हरमध्ये 46 धावांची गरज होती. धोनी मैदानात असल्याने चेन्नईचे चाहते उत्सुक होते. मात्र, धोनीला सामना जिंकवता आला नाही. मात्र, धोनीने चाहत्यांचं मन नक्कीच जिंकलं आहे. धोनीने 16 बॉलमध्ये 37 धावा केल्या. त्यात त्याने 4 फोर अन् 3 सिक्स मारले. दिल्लीकडून पृथ्वीने 43, वार्नरने 52, तर ऋषभ पंतने 4 चौके आणि 3 षटकारांच्या मदतीने 51 धावांची ताबडतोब इनिंग खेळली. तर मथीशा पथिरानाने चेन्नईसाठी 3 विकेट्स घेतल्या होत्या. चेन्नईकडून अजिंक्य रहाणेने 45 धावा अन् डॅरियल मिशेलने 34 धावांची खेळी केली.
'पृथ्वी शॉ'चा तडाखा
दिल्लीने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऋषभ पंतने या सामन्यात मोठा बदल केला अन् सलामीवीर पृथ्वी शॉला संघात पुन्हा संधी दिली. पृथ्वीने संधीचं सोनं केलं अन् 27 बॉलमध्ये 43 धावा कुटल्या. त्याला वॉर्नरने खंबीर साथ दिली.
पंतची कप्तानी खेळी
सुरूवातीला झुंजत असलेल्या ऋषभ पंतने मैदानात पाय रोखले अन् 32 बॉलमध्ये 52 धावांची महत्त्वाची खेळी केली. त्यात त्याने 4 फोर अन् 3 सिक्स खेचले.
मथीशा पथिरानाची भेदक गोलंदाजी
चेन्नईचा स्टार गोलंदाज मथीशा पथिरानाने 10 व्या ओव्हरमध्ये खेळ पालटला. पथिरानाने आपल्या यॉर्करच्या जोरावर वॉर्नरची विकेट काढली. त्यानंतर त्याने 15 व्या ओव्हरमध्ये डॅरिल मिचेल आणि ट्रिस्टन स्टब्स यांची विकेट काढली.
रचिनच्या बॅटला बॉल बसेना
चेन्नईचा सलामीवीर रचिन रविंद्र याची सामन्यात चांगलीच फजिती झाल्याचं दिसून आलं. कॅप्टन ऋतुराज बाद झाल्यानंतर रचिनची बॅटिंग गडबडली. रचिन रविंद्रने 12 बॉलमध्ये फक्त 2 धावा केल्या.
चेन्नईसाठी रहाणे संकटमोचक
दोन्ही सलामीवीर फेल गेल्यानंतर अजिंक्य रहाणेने संयमी खेळी केली अन् अखेर आक्रमक फटकेबाजी केली. अजिंक्य रहाणेने 30 बॉलमध्ये 45 धावा केल्या. त्यात 5 फोर अन् 2 सिक्सचा समावेश आहे.
धोनी खेळला पण हरला
अखेरच्या 2 ओव्हरमध्ये चेन्नईला 46 धावांची गरज होती. मात्र, धोनी आणि जड्डू उपस्थित असताना त्यांना चेन्नईला विजय मिळवून देता आला नाही. मुकेश कुमारने 19 व्या ओव्हरमध्ये धोनीला अडचणीत आणलं अन् दिल्लीच्या पारड्यात सामना झुकवला.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.
चेन्नई सुपर किंग्स प्लेईंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पथिराना आणि मुस्तफिजुर रहमान