मुंबई : आयपीएलच्या १२ व्या पर्वाचा जवळपास अर्धा टप्पा उलटला आहे. आयपीएल स्पर्धेत दरवर्षी किमान एकतरी कॅरोबियन खेळाडू आपल्या खेळाची छाप सोडतोच. यंदाच्या आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी आंद्रे रसेल करत आहे. रसेल या पर्वाच्या सुरुवातीपासूनच आपल्या बॅट-बॉलने ऑलराऊंड कामगिरी करत आहे. इतके नव्हे तर तो निर्णायक वेळी टीमला विजय मिळवून देत आहे. आंद्रे रसेलने त्याच्या या विस्फोटक खेळीचे श्रेय ख्रिस गेलला दिले आहे. आंद्रे रसेल सध्या कोलकाताचे टीमचे प्रतिनिधित्व करत आहे.
रसेलने 'बीबीसीच्या डुसरा पोडकास्ट'ला मुलाखत दिली तेव्हा तो म्हणाला, 'ख्रिस गेलमुळे माझ्या क्रिकेट जीवनात फार मोठा बदल झाला आहे. गेलकडून मी फार काही शिकलो आहे. मी खेळण्यासाठी हलक्या बॅटचा उपयोग करायचो. पण हलक्या बॅटने मारलेला फटका हा फार दूर जात नाही किंवा अपेक्षेपेक्षा फार कमी दूर जातो. टी- २० वर्ल्ड कप २०१६ स्पर्धेदरम्यान ख्रिस गेलने स्वत:हून येऊन मला सल्ला दिला. तू फार चांगला खेळतोस पण बॅटिंग करताना वजनदार बॅटचा वापर कर, तू मोठी बॅट वापर, कारण तुझ्यात तेवढी क्षमता आहे.'
टी-२० वर्ल्ड कप २०१६ चे आयोजन भारतात करण्यात आले होते. हा वर्ल्ड कप वेस्ट इडिंजने श्रीलंकेचा पराभव करुन पटकावला होता. 'या वर्षाने माझे जीवन पूर्णपणे बदलून टाकले. मी सेमीफायनल मध्ये २० बॉलमध्ये ४३ रनची खेळी केली होती. भारताने विजयासाठी १९३ रनचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मी निर्णायक क्षणी उपयोगी खेळी केली होती. मी सध्या आकाराने मोठी असलेल्या बॅटचा वापर करतो,' असं वक्तव्य रसेलने केलं.
'मी आपल्या खेळात बदल घडवून आणण्यासाठी जीममध्येही कसून सराव करत आहे. तसेच मी माझ्याकडून चांगली कामगिरी व्हावी यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला आहे, अशी प्रतिक्रिया रसेलने दिली.
आपल्या खेळीने आंद्रे रसेलने प्रतिस्पर्धी टीम आणि त्यांच्याकडील बॉलरमध्ये दहशत निर्माण केली आहे. तोडफोड बॅटिंग करणाऱ्या आंद्रे रसेलला २०१७ साली आयपीएल खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. 'ती वेळ माझ्यासाठी फार निराशाजनक होती. मला सहसा रडू येत नाही, पण बंदीच्या निर्णयामुळे मला रडू आवरता आले नाही, असं विधान रसेलने केलं. रसेलवर २०१७ साली डोपिंग-कोड उल्लंघनासाठी बंदी घालण्यात आली होती.
आंद्रे रसेलने आयपीएलच्या १२ व्या पर्वात स्फोटक कामगिरी केली आहे. रसेलने बॅटिंग करताना १० मॅचमध्ये २१७ च्या स्ट्राईक रेटने ३९२ रन कुटल्या आहेत. यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. ६५ रन ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. रसेलने यंदाच्या मोसमात तब्बल ४१ सिक्स तर २३ फोर लगावले आहेत.