महिंदा अँड महिंदा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी आपला शब्द पाळला असून, तिरंदाज शीतल देवीला नवी कोरी महिंद्रा-स्कॉर्पिओ एन भेट म्हणून दिली आहे. कार मिळाल्यानंतर शीतल देवीने आभार मानले आहेत. मंगळवारी, आनंद महिंद्रा यांनी पॅरालम्पिक खेळाडू शीतल देवी आणि तिच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी इतक्या अडचणींवर मात केल्याबद्दल तसंच पायांच्या मदतीने तिरंदाजी करण्यास सक्षम असल्याबद्दल एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याबद्दल कौतुक केलं.
दरम्यान या निमित्ताने शीतल देवीने आनंद महिंद्रा यांच्यासह झालेल्या पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. शीतल देवीने गतवर्षी पॅरालम्पिकमध्ये भाग घेत तिरंदाजीत कांस्यपदक जिंकलं होतं. यानंतर जेव्हा आनंद महिंद्रा यांनी संपर्क साधला तेव्हा तिला तो प्रँक असल्याचं वाटलं होतं. दरम्यान कार मिळाल्यानंतर आपण आणि कुटुंबीय प्रार्थना करण्यासाठी कातराला गेल्याचं तिने सांगितलं आहे. आपल्या गावातील खडतर रस्त्यांवर धावण्यासाठी स्कॉर्पिओ-एन अगदी योग्य असल्याचंही तिने म्हटलं आहे.
"कृतज्ञतेने भारावून गेले आहे! मी 16 वर्षांची असताना, माझ्या कुटुंबाकडून मला फोन आला की, आनंद महिंद्रा सर मला माझ्या पसंतीची महिंद्रा कार भेट देत आहेत! मी आशियाई पॅरा गेम्स दरम्यान ऑफलाइन होते आणि मला वाटलं की हा एक विनोद आहे. पण जेव्हा मला कळलं की ते खरे आहे, तेव्हा मी खूप उत्साहित झाले!", असं शीतलने एक्स पोस्टमध्ये सांगितलं आहे.
"मी 18 वर्षांची झाल्यानंतर कार स्विकारण्याचा निर्णय घेतला. माझ्या वाढदिवसानंतर, मी आनंद महिंद्रा सरांना भेटले. हा पूर्ण सन्मान आहे! तुमच्या दयाळूपणा आणि प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद, सर. महिंद्रा गाडी निवडणे कठीण होते, परंतु स्कॉर्पिओ N माझ्या मनात बसली आहे. माझ्या गावातील खडबडीत रस्त्यांसाठी परिपूर्ण आहे. त्याच्या पहिल्या ड्राईव्हसाठी, आम्ही कृतज्ञता आणि प्रार्थना करण्यासाठी कटरा येथे निघालो आहोत," असं शीतलने पुढे म्हटलं आहे.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये शीतलने तिची सर्वोत्तम कामगिरी केली, जिथे तिने राकेश कुमारसह मिश्र सांघिक कंपाउंड स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं. शीतल आणि राकेशच्या जोडीने इनव्हॅलिडेस येथे इटलीच्या मॅटेओ बोनासिना आणि एलिओनोरा यांना 156-155 असे हरवून तुर्कीयेच्या पॅरालिम्पिक विक्रमाची बरोबरी केली.
18 वर्षीय शीतलने महिला वैयक्तिक कंपाउंड स्पर्धेच्या रँकिंग फेरीत 703 गुण मिळवून अल्पावधीतच जागतिक विक्रमही केला. परंतु पात्रता फेरीच्या अंतिम शॉटमध्ये तुर्कीयेच्या ओझनूर क्युअरने 704 गुणांसह तिला मागे टाकले.
पॅरालिम्पिकसह शीतलने इतर विविध स्पर्धांमध्येही चांगली कामगिरी केली. 2022 मध्ये हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये तिने वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं जिंकली. 2023 मध्ये, तिने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मिश्र सांघिक स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले.