Why Do We Offer Flowers To Gods: हिंदू (Hindu) धर्मामध्ये देवी-देवतांच्या पूजेला फार महत्त्व आहे. धार्मिक मान्यतांनुसार देवाची विधिवत पूजा केल्याने मानसिक शांती मिळते. लोक अनेकदा धार्मिक व्रत वैकल्यं, धार्मिक अनुष्ठान, पूजा, हवन, आरती आणि व्रत करतात. देवाची पूजा करताना आवर्जून फुलं वाहिली जातात. फुलांशिवाय पूजा करु नये असं म्हटलं जातं. फुलांशिवाय पूजा केली तर ती अपूर्ण मानली जाते. मात्र देवाच्या पूजेमध्ये फुलांना एवढं महत्त्वं का असतं? यामागील कारण काय आहे जाणून घेऊयात.
फुलांमध्ये सुगंध असतो. फुलांचा दरवळ हा वातावरण प्रसन्न करतो याच कारणासाठी देवाची पूजा करताना देवाच्या चरणावर फुलं वाहिली जातात असं अयोध्येमधील किर्तनकार पवन दास शास्त्री सांगतात. फुलांमुळे वातावरण मंगलमय आणि प्रसन्न होते. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा पूजा करताना जाणवते. देवालाही फुलांचा सुगंध आवडतो असं सांगितलं जातं. याच साऱ्या कारणांमुळे देवी-देवतांची पूजा करताना फुलं वाहिली जातात.
धार्मिक मान्यतांनुसार पूजा करताना देवाला फुलं वाहिली तर भक्तांच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात. शास्त्रांमध्येही याबद्दलचा उल्लेख असल्याचं सांगितलं जातं. मात्र येथे केवळ देवी-देवतांच्या मस्तकावर फुलं असावीत असं सांगण्यात आलं आहे. धार्मिक मान्यतांनुसार वेगवेगळ्या देवांना वेगवेगळी फुलं आवडतात.
लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे. माता लक्ष्मी ज्यांच्यावर प्रसन्न होते त्यांना कधीच आर्थिक चणचण जाणवत नाही. लक्ष्मीला कमळाचं फूल फार प्रिय आहे.
भगवान शंकराला भांग, धोत्रा, बेलाची पानं प्रिय आहेत. तसेच शंकराची पूजा करताना पांढऱ्या रंगाचं कोणतंही फूल वाहता येतं असं सांगितलं जातं.
हिंदू धर्मामध्ये कोणतंही शुभ कार्य प्रारंभ करताना गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला दुर्वा फार प्रिय आहे. तसेच गणपतीला जास्वंदाचं फुलंही फार आवडतं. त्यामुळे या दोन गोष्टींचा वापर गणपतीची पूजा करताना आवर्जून केला जातो.
हनुमानाला कलयुगाचा राजा असं म्हटलं जातं. हनुमानाला लाल रंगाचं गुलाब आणि रुईच्या पानांची माळ वाहिली जाते.
दुर्गा मातेला लाल रंगाची फुलं आवडतात. यामध्ये गुलाब, कमळ किंवा इतर लाल रंगांच्या फुलांचा समावेश होतो.
कृष्णाला कुमुद, करवरी, मालती, पळसची फुलं वाहिली जातात.
भगवान विष्णूला तुळस फार प्रिय आहे. मात्र याचबरोबर कमळ, केवडा, चमेली आणि चंपा ही फुलंही विष्णूला वाहिली जातात.
सूर्याला प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचं कमळ, कनेर आणि झेंडूची फुलं वाहिली जातात.
महागौरीला लाल रंगाची फुलं फार आवडतात.