लॉकअपच्या गजातून बाहेर पडत चोराने ठोकली धूम, VIDEO पाहून व्हाल हैराण

लॉकअपचे गज न वाकवता, न तोडता आरोपी आला बाहेर, आणि झाला पसार  

Updated: Mar 21, 2022, 06:32 PM IST
लॉकअपच्या गजातून बाहेर पडत चोराने ठोकली धूम, VIDEO पाहून व्हाल हैराण title=

हेमंत चापुडे, झी मीडिया चाकण : लॉकअपचे गज वाकवून किंवा तोडून आरोपी पळाल्याची दृष्य आपण अनेकवेळा सिनेमांमध्ये पाहिली असतील. पण लॉकअपचे गज न वाकवता, न तोडता दोन गजामधून आरोपी पळाल्याचं कधी पाहिलंय का. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. दोन गजाच्या इतक्या लहान जागेतून माणूस कसा बाहेर पडेल. 

पण ही गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चाकण पोलीस स्टेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लॉकअपचे गज न वाकवता चोराने गजातून अलगद बाहेर पडत पोलीस स्टेशनमधून धूम ठोकली. 

कुणाल वीर असं या आरोपीचं नाव आहे. घरफोडी आणि चोरी प्रकरणात कुणाल लॉकअपमध्ये बंद होता. आज सकाळी सव्वा सात वाजता पोलीस आपल्या कामात व्यग्र असताना कुणालने लॉकअपमधून धूम ठोकली. पोलिसांना काही कळायच्या आतच कुणाल दोन गजांमधून अलगद बाहेर आला आणि पसार झाला.

कुणाल पसार झाल्याचं लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ शोध मोहिम राबवली आणि काही वेळेतच त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या. यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून दोन गजातून कसा बाहेर पडला याचं प्रात्यक्षिक करुन दाखवायला लावलं.