कोणी चप्पल सोडून पळालं, कोणाला मुलीचे मार्क तर कोणाला जावई प्रेम भोवलं; अजब कारणांनी CM पद गमावलेले 6 नेते

Leaders Who Left Maharashtra CM Post For Weird Reasons: महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदासाठी मागील काही वर्षांपासून सुरु असलेला संघर्ष आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवला आहे. मात्र आपल्यापैकी फार कमी लोकांना राज्याच्या अशा मुख्यमंत्र्याबद्दल ठाऊक आहे ज्याला लेकीचे मार्क वाढवल्यामुळे खुर्ची सोडावी लागली आहे किंवा एखाद्या मुख्यमंत्र्याला अगदी त्याच्या चप्पल आहे तशा सोडून बैठकीतून पळ काढावा लागला आणि नंतर राजीनामा द्यावा लागला आहे. अशाच पाच नेत्यांबद्दल जाणून घेऊयात यांनी विचित्र कारणांमुळे थेट राज्यातील सर्वात मोठं पद सोडावं लागलं.

| Oct 22, 2024, 15:01 PM IST
1/12

maharashtracm

राज्यातील अनेक मुख्यमंत्र्यांना घोटाळ्यांचे आरोप झाल्याने पद सोडावं लागल्याचं इतिहासात डोकावल्यास पाहयला मिळतं. मात्र कधी जावयामुळे तर कधी मुलीमुळे गोत्यात आल्याने थेट मुख्यमंत्रीपद सोडावं लागलेल्या नेत्यांबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? त्याचसंदर्भात...

2/12

maharashtracm

मुख्यमंत्रिपदावरुन मागील पाच वर्षात घडलेलं सत्तानाट्य आणि त्यानंतरचं राजकीय भूकंपांचं सत्र हे महाराष्ट्रातील जवळपास सर्व सुजाण नागरिकांना अगदी तोंडपाठ झालं असेल इतक्या वेळा वेगवेगळ्या बातम्या आणि चर्चांमधून समोर आलं आहे. मागील पाच वर्षात राज्याने अडीच दिवसाच्या अल्प कालावधीच्या सरकारसहीत एकूण तीन वेगवेगळे मुख्यमंत्री पाहिले.

3/12

maharashtracm

मुख्यमंत्री पदाचा कालावधी वाटून घेण्यावरुन झालेल्या सत्तासंघर्षादरम्यान अजित पवारांनी केलेलं बंड आणि त्यानंतर अवघ्या अडीच दिवसांसाठी सत्तेत आलेलं भाजपा आणि बंडखोर अजित पवारांचं सरकार ते नंतर एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने बरखास्त झालेलं महाविकास आघाडी सरकार असा सारा नाट्यमय घडामोडींचा पट या पाच वर्षात महाराष्ट्राने अनुभवला. 

4/12

maharashtracm

उद्धव ठाकरेंनंतर भाजपाच्या समर्थनाने अवघ्या 40 आमदारांच्या जोरावर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री झाले. मात्र या 20 मुख्यमंत्र्यांपैकी 3 मुख्यमंत्र्यांना फारच विचित्र कारणांमुळे पद सोडावं लागलं होतं. यापैकी एका मुख्यमंत्र्‍यावर आमदार धावून गेले होते. तर एकाला चक्क मुलीचे मार्क वाढवून दिल्याने पद सोडावं लागलेलं. हे मुख्यमंत्री कोण आणि नेमकं काय घडलेलं हे जाणून घेऊयात.  

5/12

maharashtracm

बाबासाहेब भोसले हे जानेवारी 1982 ते फेब्रुवारी 1983 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. बाबासाहेब भोसले हे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मर्जीतले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जायचे. त्यांचा मुख्यमंत्रि‍पदाचा कार्यकाळ केवळ 13 महिन्यांचा होता. मात्र त्याची सांगता फारच नाट्यमय पद्धतीने झाली.

6/12

maharashtracm

बाळासाहेब भोसले राज्याचे मुख्यमंत्री असताना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रचंड गोंधळ झाला. त्यावेळी पंतप्रधानांच्या मर्जीतील राज्यातील सर्वोच्च नेत्यावर काही चक्क स्वपक्षीय आमदार धावून गेले. काँग्रेसचेच आमदार मुख्यमंत्र्यांच्या अंगावर धावून गेल्याने मुख्यमंत्री चांगलेच खवळले.

7/12

maharashtracm

‘भाषा बंडाची, वृत्ती गुंडाची आणि कृती षंढाची’ अशा खरमरीत शब्दांमध्ये तेव्हा बाबासाहेब भोसले यांनी अंगावर धावून आलेल्या आमदारांवर निशाणा साधल्याने वातावरण आणखीन तापलं. आमदार अंगावर धावून गेल्याने बाबासाहेब भोसलेंना चपला टाकून विधिमंडळाच्या बैठकीतून पळ काढावा लागला होता. हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवसांनंतर त्यांचे मुख्यमंत्रीपद गेलं.

8/12

maharashtracm

बॅरिस्टर ए. आर. अंतुले हे बाबासाहेब भोसलेंच्या तुलनेत चांगलेच परिचयाचे नाव म्हणावे लागेल. सिमेंट घोटाळ्यामुळे अंतुलेंचं मुख्यमंत्री पद गेलं. अंतुले हे राज्याचे सातवे मुख्यमंत्री होते. त्यांनी 9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982 दरम्यान राज्याचं मुख्यमंत्री पद भुषवलं होतं. त्यांचे 2014 साली निधन झाले.  

9/12

maharashtracm

शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांचं मुख्यमंत्रीपद चक्क मुलीचे मार्क वाढवल्याने गेलं. 3 जून 1985 ते 6 मार्च 1986 या कालावधीत मुख्यमंत्री राहिलेले शिवाजीराव हे महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री होते.

10/12

maharashtracm

सध्या भाजपाचा झेंडा हाती घेतलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना ‘आदर्श’ घोटाळ्यात झालेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले हे सर्वांनाच टाऊक आहे.

11/12

maharashtracm

घोटाळ्यामुळे केवळ काँग्रेसच्याच नेत्यांचं मुख्यमंत्री पद गेलं आहे असं नाही. जावयाच्या फायद्यासाठी पुण्यातील जमिनीचे आरक्षण बदलल्याचा ठपका शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झालेल्या मनोहर जोशी यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र पद जाण्याआधीच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी 1995 ते 1999 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलं.  

12/12

maharashtracm

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर एका विचित्र वादावरुन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पद सोडावं लागलं होतं. अभिनेता पुत्र रितेश देशमुख आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना घेऊन विलासराव देशमुख हल्ला झालेल्या ठिकाणांपैकी एक असलेल्या ताज हॉटेलची ‘पाहणी’ करायला गेल्याचे फोटो समोर आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आणि त्यातचं त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)