डॉक्टरांनी आधी तिच्या बाहुलीला प्लास्टर लावलं आणि मग तिला...

११ महिन्यांची चिमुरडी बेडवरुन खाली पडली आणि यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला. पण डॉक्टरांसमोर मात्र तिच्या पायाला प्लास्टर लावण्याचा मोठा प्रश्न होताच, शिवाय डॉक्टरांसमोर मोठं आव्हान होतं ते तिला दोन आठवडे प्लास्टर तसंच लावून ठेवण्याचं...

Aug 30, 2019, 21:17 PM IST
1/3

दिल्लीतील ११ महिन्यांची चिमुरडी जिकरा आणि तिचं कुटुंब दरियागंज भागात राहतात. १७ ऑगस्ट रोजी जिकरा बेडवरुन खाली पडली. तिचे आई-वडिल तिला लोकनायक रुग्णालयात घेऊन आले. डॉक्टरांनी मुलीचा पाय फ्रॅक्चर झाला असून तिला प्लास्टर लावावं लागेल असं सांगितलं. ही ११ महिन्यांची चिमुरडी दुखण्याने हैराण झाली होती आणि सतत हात, पाय आपटत होती. त्यामुळे डॉक्टरांसमोर मुलीला प्लास्टर कसं लावावं हा मोठा प्रश्न होता. 

2/3

मुलीच्या आईने डॉक्टरांना सांगितलं की, तिचं तिच्या बाहुलीवर अतिशय प्रेम आहे. ज्यावेळी आम्ही तिच्या बाहूलीला दूध पाजण्याचं नाटक करतो, त्यावेळी तीदेखील गुपचूप दूध पिते...आणि याच गोष्टीमुळे डॉक्टरांना एक कल्पना सुचली. डॉक्टरांनी तिच्या घरातील बाहुली मागवली आणि बाहुलीसह जिकरालाही रुग्णालयातील बेडवर झोपवलं. आधी बाहुलीच्या पायाला पट्टी बांधली. बाहुलीला पट्टी बांधताना जिकरा बाहुलीकडे पाहतच होती. त्यानंतर जिकरानेही प्लास्टर लावून घेतलं.

3/3

आतादेखील कोणतंही औषध द्यायचं असतं, त्यावेळी डॉक्टर आधी बाहुलीला औषध देतात आणि मग जिकराला. डॉक्टरांनी केलेल्या या अनोख्या उपचारामुळे त्या मुलीने दोन आठवड्यांहून अधिक काळ रुग्णालयात काढला. आता तिला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्जही मिळणार आहे. डॉक्टरांची ही अनोखी कल्पना इतर डॉक्टरांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरेल.