सतत जागी राहणारी मुंबई भयावह शांततेत हरवते तेव्हा...
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे बंद आहे. कधीही न थांबणारी, 24 तास सुरु असणारी ही मुंबई, मुंबईकरांची पावलं मात्र आज कोरोना व्हायरसने थांबली आहेत. गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटीपासून मुंबईतील अनेक रस्त्यांवर शांतता पसरली आहे. सर्वच रस्ते, दररोज तुफान गर्दी असणारी ठिकाणं ओस पडली आहेत. मुंबईत हे असं चित्र असलं तरी घरी राहूनच, एकमेकांच्या सानिध्यात न येताच हे कोरोनाचं सावट दूर करण्यास मदत होणार आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाकडून अनेक उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. जनतेला गरज नसेल तर घराबाहेत न पडण्याचं कळकळीचं आवाहन शासनाकडून करण्यात येतंय. लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी दिवस-रात्र आपली सेवा बजावत आहेत. अत्यावश्यक सेवा बजावणारे, सर्व डॉक्टर, नर्स, पोलीस, मीडिया, सफाई कर्मचारी हे सर्वच जण जनतेसाठी अहोरात्र काम करत आहेत.