हिंगोली : सर्वसामान्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलीस नागरिकांशी कसं वागतात, याचं उदाहरण समोर आलं आहे. हिंगोलीच्या पोलीस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी फेसबुकवर या प्रकरणाला वाचा फोडली आहे. मुंबईमध्ये अंधेरीत रिक्षाचालकांनी त्यांना भाडं नाकारलं. पोलिसांकडे मदत मागण्यासाठी गेलेल्य़ा पाटील यांची मात्र मोठी निराशा झाली.
सोबत बरंच सामान, पाय फ्रॅक्चर अशा अवस्थेतही रिक्षावाल्यांची मुजोरी त्यांना अनुभवायला आली. त्यानंतर कहर केला तो पोलिसांनी. रिक्षावाल्यांची तक्रार करण्यासाठी पाटील यांनी जवळ तैनात असलेल्या पोलिसांकडे धाव घेतली. मात्र त्यांना मदत करायची सोडून या पोलिसांनी पाटील यांच्याशी अत्यंत उर्मट भाषेत बोलून त्यांचा वारंवार पाणउतारा केला. या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेत. त्यासाठी सांताक्रूझचे सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रय भरगुडे यांची नेमणूक केली असून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
सुजाता पाटील यांना अंधेरीत रिक्षाचालकांनी इच्छित स्थळी जायला नकार दिला. त्यानंतर सुजाता पाटील यांनी स्वतःची ओळख उघड न करता जवळच्या पोलीस स्थानकात मदत मागितली. तेव्हा पोलिसांनीही त्यांना रिक्षा पकडून देण्यासंदर्भात मदत दिली नाही. उलट उद्दामपणे वागले, असा आरोप सुजाता पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुकवरही एक पोस्ट लिहिली आहे.
पाहा व्हिडिओ