www.24taas.com, रायगड
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात असणाऱ्या बोर्ली या गावात जवळजवळ ११ तास धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आलंय. त्यामुळे नागरिकांच्या जीवात जीव आलाय.
वाट चुकलेल्या एका बिबट्यानं काल सकाळी साडेदहाच्या सुमारास मानवी वस्तीमध्ये प्रवेश केला होता आणि तो बोर्ली गावातील रहिवासी अब्दुल गिरे यांच्या घरात घुसला. त्यावेळी बिबट्यानं गिरे यांना पंजा मारला आणि जखमी केलं. त्यानंतर अनिल पंगारे हा तरुण घरात शिरला. बिबट्यानं त्याच्यावरही हल्ला चढवला. गिरे यांच्या घरातल्या पोटमाळ्यावर हा बिबट्या लपून बसला होता. यावेळी बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झालेत.
त्यानंतर, या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी संजय गांधी उद्यानातलं विशेष पथकाला पाचारण करण्यात आलं. मोठ्या प्रयत्नानंतर वनविभागानं बेशुद्धीचं इजेक्शन देऊन या बिबट्याला पकडण्यात यश मिळवलं. बिबट्याला पकडण्यात आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.