www.24taas.com, मुंबई
तुम्ही जर ‘नोकिया’ यूजर असाल तर यापुढे मोबाईल चोरी झाला, हरवला किंवा पाण्यात पडला तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज लागणार नाही. कारण, नुकतीच घटती मागणी लक्षात घेऊन मोबाईल कंपनी नोकियानं आपल्या प्रोडक्टसवर इन्शुरन्स कव्हर देण्याची घोषणा केलीय.
तुमच्या नोकिया हॅन्डसेटला कोणत्याही प्रकारची हानी पोहचल्यास त्याची भरपाई कंपनी करणार आहे. काही कारणानं मोबाईल पडला, खराब झाला किंवा मोबाईलमध्ये पाणी गेलं तर त्याची भरपाई नोकिया करेल. यासाठी नोकियानं एका प्रसिद्ध विमा कंपनीबरोबर एक करारही केलाय.
या इन्शुरन्स प्लानमध्ये ग्राहकांना ५० रुपये किंवा मोबाईल किंमतीच्या १.२५ टक्के प्रिमिअम भरावा लागेल. देशभरातील नोकियाच्या कोणत्याही ब्रांडेड रिटेल स्टोअरमधून विकत घेतलेल्या कोणत्याही मोबाईलवर किंवा स्मार्टफोनवर हा इन्शुरन्स उपलब्ध असेल. १४ मार्चपासून या योजनेला सुरुवात होईल. सुरुवातीला ही योजना मुंबई, दिल्ली-एनसीआर, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू आणि कोचीनमध्य उपलब्ध होणार आहे.