मेलबर्न : टी-20 सीरिजमध्ये 1-0नं आघाडीवर असणाऱ्या टीम इंडियाला मेलबर्नमध्ये होणारी दुसरी टी-20 खिशात घालून सीरिज जिंकण्याची नामी संधी चालून आली आहे. शुक्रवारी होणाऱ्या या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियानं त्यांचे स्टार बॅट्समन डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथला विश्रांती द्यायचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्ध दौऱ्याआधी या दोघांना विश्रांती मिळावी म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियानं हा निर्णय घेतला आहे. पण दुखापतीमुळे पहिली टी-20 मॅच मुकलेला ग्लेन मॅक्सवेल दुसरी मॅच खेळेल हे जवळपास निश्चित झालं आहे.
याआधी ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा 37 रन्सनी पराभव केला होता. आता दुसऱ्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगचे आधार स्तंभ वॉर्नर आणि स्मिथ नसल्यामुळे वनडे सीरिजमधील पराभवाचा बदला घेण्याची संधी धोनीच्या शिलेदारांपुढे चालून आली आहे.