नवी दिल्ली: भारतीय महिला फूटबॉल टीमची माजी कॅप्टन सोना चौधरीनं आपल्या पुस्तकामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सोना चौधरीनं वाराणसीमध्ये आपलं पुस्तक 'गेम इन गेम'चं प्रकाशन केलं. सोनानं या पुस्तकामध्ये टीम मॅनेजमेंट, कोच आणि सेक्रेटरीवर शोषण केल्याचे आरोप केले आहेत.
कोच आणि मॅनेजमेंट महिला खेळाडूंचं शोषण करायचे. परदेश दौऱ्यावेळी या शोषणापासून वाचण्यासाठी खेळाडू समलैंगिक संबंध बनवायच्या असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.
स्टेट टीम आणि नॅशनल टीममध्ये महिला खेळाडूंनी कॉम्प्रोमाईज करावं यासाठी त्यांना त्रास दिला जायचा, असेही आरोप सोनानं केले आहेत. सोना चौधरीनं 1995मध्ये फूटबॉल खेळायला सुरुवात केली. एकाच वर्षामध्ये सोना टीमची कॅप्टन झाली, पण एक वर्षच सोनाला कॅप्टन राहता आलं. 2002 मध्ये लग्न केल्यानंतर सोना वाराणसीमध्येच स्थायिक झाली.