www.24taas.com,नगर
मनसेचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी किरण काळे यांनी फेटाळलेत... राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमध्ये शांततेने आंदोलन केल्याचा दावा त्यांनी केलाय.. तसंच मनसेकडूनच गाडीतून दगड आणण्यात आल्याचा आरोपही काळे यांनी केलाय...
खोटं बोला रेटून बोला, अशी रणनिती मनसेची आहे. त्याचा प्रत्यय इथे आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारची दगडफेक करण्यात आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत शांतपद्धतीने आंदोलन केले. उलट मनसेचे कार्यकर्ते घटनास्थळी येतांना गाडीतून दगड घेऊन आले होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी किरण काळे यांनी केला आहे.
जसा नेता तसे कार्यकर्ते... त्यामुळे त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार अशीही टीका काळे यांनी केली आहे.
NCPने लोकशाही मार्गाने विरोध करावा- नांदगावकर
मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी राज यांच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केलेत... विरोध करायचा असल्यास लोकशाही मार्गाने करा अन्यथा समोर येऊन हल्ले करा असं आव्हान त्यांनी राष्ट्रवादीला दिलंय... शिवाय अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक करतात काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय...
नेमक काय प्रकार झाला
राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक करण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप मनसेनं केलाय. अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार गावातील ही घटना आहे. सध्या राज ठाकरे यांचा राज्याचा दौरा सुरु आहे.. या अंतर्गत भगवानगड इथून राज अहमदनगरकडे येत असताना हा प्रकार घडला.. गेल्या काही दिवसांपासून राज आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे.. या पार्श्वभूमीवर राज यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिंगार गावाजवळ मोठ्या संख्येने जमले होते असं सांगण्यात येतंय.. त्यानंतर राज यांचा ताफा येताच या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय.. दरम्यान या घटनेनंतर मनसैनिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं..दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागलाय...