राज्यात आजपासून तीन दिवस लोडशेडींग सुरु...

राज्यात पुन्हा लोडशेडींगचे संकट उद्धभवणार आहे. आजपासून तीन दिवस हे भारनियमन असणार आहे. अकोला ते औरंगाबाद या उच्चदाब वाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने शुक्रवार ते रविवारदरम्यान राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 25, 2014, 10:36 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
राज्यात पुन्हा लोडशेडींगचे संकट उद्धभवणार आहे. आजपासून तीन दिवस हे भारनियमन असणार आहे. अकोला ते औरंगाबाद या उच्चदाब वाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने शुक्रवार ते रविवारदरम्यान राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होणार आहे.
या विज वाहिनी कामाचा फटका राज्यातील प्रमुख शहरांसह ग्रामीण भागाला बसणार आहे. ठाणे, नवी मुंबईसह औरंगाबाद, जालना, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, बारामती, सोलापूर या भागात भारनियमन होणार असल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागणार आहे.
केंद्र सरकारचे पॉवर ग्रीड आणि राज्यातील महापारेषण कंपनीतर्फे 400 किलोव्होल्ट वाहिनीचे काम केले जाणार आहे. राज्यात विजेची निर्मिती पूर्व भागात होते; तर विजेची सर्वाधिक मागणी ही मध्य व पश्‍चिम महाराष्ट्रात आहे. या वाहिनीवरून सध्या एक हजार मेगावॉट विजेचे वहन होते. दुरुस्तीच्या कामानंतर या वाहिनीची क्षमता २ हजार मेगावॉटपर्यंत वाढणार आहे.
दुरुस्तीसाठी किमान ८ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता होती. मात्र, यावर तोडगा काढण्यात आला असून तीन दिवसात काम पूर्ण करण्यावर भर देण्यात आलाय. दुरुस्तीचे काम शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेपासून हाती घेण्यात येणार असून, रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ते पूर्ण होईल. ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.