www.24Taas.com, झई मीडिया, पुणे
पुण्याजवळच्या शिंदेवाडी इथली आई आणि मुलगी वाहून जाण्याची दुर्घटना असो किंवा, नुकतीच नीरा नदीत कार पडून झालेला चार मित्रांच्या मृत्यूची घटना… यामुळे पुणे-सातारा रस्ता चर्चेत आलाय. या रस्त्याच्या सहापदरी करणाचे काम सध्या सुरु आहे. या कामाबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रिलायन्स इन्फ्रा या कंपनीकडे रस्त्याच्या सहा पदरी करणाचे काम आहे. रिलायन्स इन्फ्राला या कामातून टर्मिनेट करावे. असा प्रस्ताव खुद्द नॅशनल हायवे ऑथोरटीने दिला आहे.
रिलायन्स इन्फ्रा या बड्या कंपनीला नॅशनल हायवे ऑथोरिटीनं मोठा दणका दिलाय. रिलायन्स इन्फ्राकडे पुणे ते सातारा रस्त्याच्या सहापदरीकरणाचं काम आहे. सुमारे सतराशे कोटींचा हा प्रकल्प २०१० मध्ये सुरु झाला. हे काम पूर्ण करायचं होतं मार्च २०१३ अखेरपर्यंत... मात्र अजूनही रस्त्याचं ६० टक्के काम अपूर्ण आहे. जे काम पूर्ण झालंय त्यातही अनेक त्रुटी आहेत. नॅशनल हायवे ऑथोरिटीने अनेकदा रिलायन्सच्या या चुकांची जाणीव करून दिली. अनेकदा दंडही ठोठावला. परिणाम मात्र शून्य… अखेर, नॅशनल हायवे ऑथोरिटीने रिलायन्स इन्फ्राला या कामातून टर्मिनेट करण्याचा प्रस्ताव दिला. त्यावर रिलायन्सला आता दोन महिन्यांची शेवटची मुदत देण्यात आली आहे. रिलायन्स बरोबरच नॅशनल हायवे ऑथोरिटीच्या अधिका-यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पुणे - सातारा रस्त्यावरची टोल वसुली रिलायन्स इन्फ्रा करतंय. या वसुलीतला हिस्सा मात्र रिलायन्स इन्फ्राला मिळत नाही. नॅशनल हायवे ऑथोरिटीने रिलायन्सच्या वाट्याची टोलची रक्कम रोखून धरली आहे. रिलायन्ससाठी हा मोठा धक्का समाजाला जातोय. रिलायन्सनं हे सगळं गांभीर्यानं घेतलं असतं तर शिंदेवाडी आणि नीरा नदीवरच्या चार मित्रांचा अपघात या दुर्घटना निश्चित टळल्या असत्या…
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.