www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्याचे पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी महिलांशी अरेरावी केल्याचं समोर आलंय. रानडे यांनी महिलांना शिवीगाळ करत महिलांना मारहाणही केलीय. स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीदरम्यान हा प्रकार घडला.
गुरुवारी रात्री आठच्या सुमारास कसबा पेठेतून स्वामी समर्थांची पालखी निघाली होती. ही पालखी फडके हौद चौकात पोहोचली त्यावेळी पोलीस उपायुक्त मकरंद रानडे त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी थेट मिरवणुकीतील महिलांना शिवीगाळ सुरू केली. तसंच ते महिलांच्या अंगावरही धावून गेले. मिरवणुकीतल्या लोकांवर रानडेंनी थेट लाठीहल्लाही केला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं.
परिस्थिती बिघडत असल्याचं लक्षात येताच रानडे यांनी घटना स्थळावरून पळ काढला. मात्र, रानडे यांनी जी अरेरावी केलीय त्यामुळे राजकीय पक्ष सामाजिक धार्मिक संघटनांनीही आंदोलनाचा इशारा दिलाय. दरम्यान, स्वामी समर्थांच्या या पालखी मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी होती. अशी कबुली खुद्द पोलिसांनीच दिली. तसंच वाद्य वाजवण्याचीदेखील परवानगी पोलिसांनी दिली होती. त्यामुळे रानडे यांनी या पालखीवर शिवीगाळ करत लाठीहल्ला का केला? असा प्रश्न निर्माण होतोय.
महिलांनी रानडेविरोधात तक्रार दाखल केलीय. मात्र, तक्रार दाखल करून घेण्यास पोलीस टाळाटाळ केल्याचं उघड झालंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.