www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या चिराग शेट्टीने आशियाई युवा बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद जिंकलं आहे. त्याने सहा वर्षांपूर्वीच्या प्राजक्ता सावंतच्या विक्रमाची बरोबरी करताना एम. आर. अर्जुनच्या साथीत सतरा वर्षांखालील मुलांच्या दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. त्याचबरोबर भारताच्या सिरील वर्माने पंधरा वर्षांखालील एकेरीत बाजी मारली.
भारताने या स्पर्धेत दोन ब्राँझपदकेही जिंकली. उदय पवार यांच्या बॅडमिंटन अकादमीचा विद्यार्थी असलेला चिराग आणि एम. आर. अर्जुनने निर्णायक लढतीत थायलंडच्या कॅंताफॉन वॅंगचॅरॉन-मॅक नारोंग्रित यांचा दोन गेमच्या सरळ लढतीत 21-16, 21-15 असा पाडाव केला. भारताने या स्पर्धेतील दुहेरीचे विजेतेपद 2007 नंतर प्रथमच जिंकले. तोपर्यंत या स्पर्धेस आशियाई किशोर स्पर्धाच संबोधले जात होते. त्या वेळी हनोईतील स्पर्धेत प्राजक्ता सावंत आणि राज कुमारने सोळा वर्षांखालील गटातील मिश्र दुहेरीत बाजी मारली होती.
पंधरा वर्षांखालील एकेरीच्या अंतिम लढतीत चौदावर्षीय सिरील वर्माने इंडोनेशियाच्या पुत्रा गातजा याला 21-11, 21-17 असे नमविले. त्याशिवाय बंगळूरचा डॅनियल फरीद आणि कृष्णा प्रसाद-श्रेया बोस यांनी ब्राँझ जिंकले. चीन व मलेशियाचे खेळाडू नसल्याचा फायदा भारतीयांना झाला असला, तरी त्यामुळे यशाचे श्रेय कमी होत नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.