www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानं काँग्रेस पक्ष ‘वचनपूर्ती जनजागरण यात्रा’ काढून लोकसभा निवडणुकीसाठी राज्य ढवळून काढणार आहे.
केंद्र सरकारनं घेतलेल्या लोकप्रिय निर्णयांचे क्रेडिट घेण्यासाठी काँग्रेसचा हा प्रयत्न आहे. यासाठी राज्यभर तब्बल ४ हजार ८७७ सभा होणार आहेत. विदर्भापासून या वचनपूर्ती जनजागरण यात्रेला सुरुवात होईल. याचाच पहिला भाग म्हणून आज पहिली सभा वाशिम जिल्ह्यातील करंजा इथं आयोजित करण्यात आलीय.
एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या लोकसभा जागावाटपाच्या फॉर्म्युलावरून जुंपली असतानाच काँग्रेसने सर्व योजनांचे क्रेडिट घेण्याचा हा नियोजनबद्ध कार्यक्रम आखलाय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात मतभेद असले तरी संघटनेच्या स्तरावर हा कार्यक्रम राबवून विरोधकांबरोबरच राष्ट्रवादीलाही शह देण्याचा हा प्रयत्न असल्याचं मानलं जातंय.
काँग्रेस पक्षाने २००९ च्या निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी ही जनजागरण यात्रा असणार आहे, असं प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.