मु्ंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा जवळपास 40 टक्के भाग आज अंधारात बुडालाय. टाटाच्या ट्रॉम्बे इथल्या 500 मेगावॅटच्या युनिट नंबर पाचमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मुंबईतील बहुतांश भागात वीज गायब झालीय. सकाळी पावणे दहा वाजल्यापासून हा वीजपुरवठा खंडित झालाय.
दादर, माहिम, धारावी, सायन, प्रभादेवी, परळ, शिवडी, भायखळा, चिंचपोकळी, गिरगाव, मुंबई सेंट्रल, हुतात्मा चौक परिसर, बॅलार्ड पिअर, नरिमन पॉईंट आणि मेट्रो सिनेमा परिसर या भागातील बत्ती सकाळपासून गुल झालीय. बेस्टमार्फत या भागात वीजपुरवठा होतो. परंतु बेस्टला टाटा कंपनी वीज पुरवते.
टाटाच्या युनिटमधील तांत्रिक बिघाड दूर न झाल्यानं दक्षिण मुंबईतील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. विजेचा असा खेळखंडोबा झाल्यानं आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस, बँका, संस्थांना विजेसाठी जनरेटर बॅकअपचा आधार घ्यावा लागला.
मुंबई उपनगराचा काही भागही वीज नसल्यानं काळोखात बुडाला होता. विजेच्या तुटवड्यामुळं मुंबईत भारनियमन करावं लागत असल्याचा खुलासा रिलायन्स एनर्जीनं केलाय. तर रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल, असा दावा टाटा वीज कंपनीमार्फत करण्यात येतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.