मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी युतीचे संकेत दिलेत. कधीकाळी उद्धव ठाकरेंची टाळी नाकारणारे राज ठाकरे स्वतः टाळी द्यायला उत्सुक आहेत. पण त्यांच्यासोबत युती करायला कुणी तयार होईल का?
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडलाय... आतापर्यंत नेहमीच स्वबळावर लढण्याची भाषा करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे... पण सध्या ते करतायत तरी काय? गेल्या विधानसभा निवडणुकीत जुन्नरमधून मनसेचा कसाबसा एक आमदार निवडून आला. तेव्हापासूनच मनसेच्या इंजिनाला सॉलिड गळती लागलीय. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकेक नगरसेवक पक्ष सोडून चाललाय. त्यामुळंच की काय, राज ठाकरेंनी आता युतीचे संकेत दिलेत.
युतीचा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करणार, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय. 'झी 24 तास'शी अनौपचारिक गप्पांदरम्यान ते बोलत होते. मात्र ते स्वतः कुणासोबत युती करण्यास इच्छुक आहेत, हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवलंय.
सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्या संसारात वारंवार खटके उडतायत. या दोघांचा काडीमोड होणार का? आणि काडीमोड झाल्यास भाजप मनसेसोबत घरोबा करणार की शिवसेना? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
राज ठाकरेंच्या वर्षावर मुख्यमंत्र्यांसोबत आतापर्यंत 3 गोपनीय बैठका झाल्याचं समजतंय. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी अचानक 'मातोश्री'वारी केली होती. त्या भेटीचा तपशील अजून गुलदस्तातच आहे. सेना-भाजप युतीचा तिढा न सुटल्यास मनसेचा पर्याय किंवा दबाव म्हणून वापर होऊ शकतो.
दरम्यान, मनसेशी युती करण्याबाबत थेट प्रश्न विचारला तेव्हा उद्धव ठाकरेंनी चक्क हात जोडले आणि म्हटलं 'जय महाराष्ट्र'... ही त्यांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी होती.
तूर्तास युतीची जास्त गरज आहे ती मनसेला... शिवसेना किंवा भाजपशी युती करून झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न दिसतोय. युतीचं इंधन मिळालं नाही तर मनसेचं इंजिन आणखी किती काळ धावू शकेल, हे पाहावं लागेल.