www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर बंदीची मागणी सनातन संस्थेने केलीय.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात सनातनवर आरोप करून अशा समाज विघातकी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादीनं केली होती. त्यावर सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी ‘अगोदर राष्ट्रवादीवरच बंदी घाला’, असा पलटवार केलाय. दाभोलकर हत्याप्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी सनातन संस्थेने मुंबईत एका पत्रकार परिषदेचे आयोजन केलं होतं. यावेळी ते बोलत होते.
‘सनातन’ दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात तपासासाठी पोलिसांना संपूर्ण सहकार्य करत असल्याचा दावा वर्तक यांनी केलाय. या प्रकरणी राजकीय दबावाला बळी पडून पोलिसांकडून सनातन आणि हिंदू जनजागरण समितीच्या कार्यकर्त्यांचा छळ सुरु असल्याचा आरोप वर्तक यांनी केलाय. हा छळ त्वरित थांबवा अन्यथा मानवाधिकार आयोगाकडे दाद मागणार असल्याचं वर्तक यांनी म्हटलंय.
यावेळी पत्रकार परिषदेत ‘सनातन’कडून अंधश्रद्धा निर्मुलन समितीवरही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले असून याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी वर्तक यांनी केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.