राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर विधानपरिषद सभापती?

काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर, आता राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांच्याकडे विधानपरिषद सभापतीपद जाण्याची शक्यता आहे. 

Updated: Mar 17, 2015, 09:06 AM IST
राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर विधानपरिषद सभापती? title=

मुंबई : काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर, आता राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांच्याकडे विधानपरिषद सभापतीपद जाण्याची शक्यता आहे. 

फलटणचे आमदार असलेले रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आहेत. फलटणमधून १९९५ साली ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले, त्यानंतर त्यांनी युती सरकारच्या काळात राज्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर, ते राष्ट्रवादीत दाखल झाले. १९९५ पासून ते २००९ सालापर्यंत ते फलटणचे आमदार होते. 

२००९ साली मतदारसंघ राखीव झाल्यानंतर, त्यांची विधान परिषदेत वर्णी लागली. शरद पवार यांचे निकटवर्तीय अशीही त्यांची ओळख आहे. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी जलसंपदा विभागाचा कृष्णा खोरेचा कार्यभारही सांभाळला.

विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झालाय. ४५ विरूद्ध २२ मतांनी हा अविश्वास ठराव विधान परिषदेत संमत झाला. विधान परिषदेच्या इतिहासातली अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळं काँग्रेसच्या वाट्याचा आणखी एक लाल दिवा आता विझलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात यानिमित्तानं नवं समीकरण पाहायला मिळालं. 

राष्ट्रवादीनं सभापतींच्या विरोधात मांडलेल्या या अविश्वास ठरावाला सत्ताधारी भाजपनं पाठिंबा दिला. राष्ट्रवादी आणि भाजप अशा नव्या राजकीय युतीला अविश्वास ठरावाच्या निमित्तानं सुरूवात झाल्याचं चित्र दिसतंय. याउलट सत्ताधारी शिवसेनेनं मात्र मतदानामध्ये सहभाग घेतला नाही. अविश्वास ठरावावरील चर्चेच्या वेळी भाजप विरूद्ध शिवसेना असा संघर्षही पाहायला मिळाला. 

राष्ट्रवादीच्या अविश्वास ठरावाला पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेना नेते रामदास कदम यांनी यावेळी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांमधील संबंधांना तडा गेल्याचंही चित्र यानिमित्तानं अवघ्या महाराष्ट्राला दिसलं.

या  अविश्वास  ठरावावर शिवाजीराव देशमुख यांनी दिलेली मार्मिक प्रतिक्रिया. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव  देशमुख यांच्याविरोधात सभागृहात अविश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला.  त्यावेळी राष्ट्रवादीच्या बाजूनं भाजपसोबत शेकापही उभी राहिली.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.