www.24taas.com, मुंबई
आझाद मैदानातल्या हिंसाचारप्रकरणी मुंबई पोलिसांनी सलीम चौकिया याला अटक केलीय. आशिवरा भागातल्या आनंद नगरमधील रहिवासी असलेल्या सलीम चौकियाला पोलिसांकडून एसएलआर हिसकावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
सलीमला आता क्राईम ब्रांचच्या ताब्यात देण्यात आलं असून, ते आता या प्रकरणी पुढील चौकशी करणार आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईतल्या सीएसटी परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनातील दंगलखोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेत. हातात बंदुका घेऊन धुडगूस घालणारे काही तरुण सीसीटीव्हीत कैद झाल्याने दंगेखोरांचा पर्दाफाश झालाय. आता हे दंगेखोर नेमके कोण आहेत, याचा एसआयटीचे अधिकारी शोध घेत आहेत. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे.
आझाद मैदानाजवळ झालेल्या आंदोलनात आंदोलकांमधील एका गटाने पोलिसांवर अचानक बेछूट गोळीबार सुरू केल्याचं पोलिसांचं म्हणणंय. याच गटातील एकजण हातात एसएलआर बंदुक घेऊन धुडगूस घालत असल्याचं उघड झालंय. सीएसटीवरील या हिंसाचारात २ जणांचा मृत्यू झाला. तर ६३ जण जखमी झाले होते. जखमींमध्ये ५८ पोलिसांचा समावेश आहे. मरण पावलेल्या दोघांचाही गोळी लागून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. मात्र, हा मृत्यू दंगेखोरांच्या गोळीने झाला, की पोलिसांच्या हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.
शहीद स्मारकाची डागडुजी
मुंबईतल्या शहीद स्मारकाची डागडुजी महापालिकेनं केलीये. सीएसटी परिसरात झालेल्या हिंसाचाराचा फटका या स्मारकाला बसला होता.
दंगेखोरांनी शहीद स्मारकाचा विध्वंस केल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर पालिकेनं शहीद स्मारकाची तातडीनं डागडुजी करून घेतली. डागडुजीनंतर शहीद स्मारकाचा परिसर पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.